Mon, Jul 22, 2019 04:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका : प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका : प्रकाश आंबेडकर

Published On: Jan 11 2018 1:30AM | Last Updated: Jan 11 2018 1:19AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव येथील हिंसाचाराला जबाबदार असलेल्या संघटनांच्या व्यक्‍तींकडून थेट मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गौप्यस्फोट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. पोलिसांना याबाबत माहिती असूनही त्यांनी ही गंभीर माहिती लपवल्याचा आरोप त्यांनी केला. रावसाहेब पाटील नामक व्यक्‍तीने फेसबुकवर ही धमकी दिली आहे. स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेणारी ही व्यक्‍ती प्रत्यक्षात संभाजी भिडे यांची निकटवर्तीय असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

माहिती लपवणार्‍या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पुणे पोलीस आयुक्‍त, अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, अतिरिक्‍त अधीक्षक व गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांना याबाबत माहिती असल्याचे आंबेडकर म्हणाले. फेसबुकवर करण्यात आलेली पोस्ट त्यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ दाखवली. पाटील यांनी एक जानेवारीला केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट व सुधींद्र कुलकर्णी यांना कापा, ही माणसे म्हणजे समाजाला लागलेली कीड आहेत, असे म्हटले होते. हिंदुत्ववादी संघटनांमध्ये वर्चस्ववादाचा लढा सुरू झाला असल्याचे ते म्हणाले. एवढा गंभीर प्रकार घडूनही पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेतात, असा आरोप त्यांनी केला.