प्रफुल्ल पटेल यांची ‘ईडी’कडून चौकशी

Last Updated: Oct 19 2019 1:26AM
Responsive image

Responsive image

मुंबई : प्रतिनिधी
कुख्यात मोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबासोबत आर्थिक व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची शुक्रवारी दिवसभर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कसून चौकशी केली. चौकशीला हजर राहण्यासाठी पाठविलेल्या नोटिसीवरून शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पटेल हे ‘ईडी’च्या बेलार्ड पियर येथील कार्यालयात हजर झाले.

दाऊदचा विश्वासू हस्तक आणि ड्रग्जमाफिया असलेल्या इक्बाल मिर्ची याने अवैध धंदे, खंडण्या, ड्रग्ज तस्करीतून मिळवलेल्या पैशांतून वरळीतील मोक्याच्या ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या. यातील एका मालमत्तेचा विकास पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीने केला. पटेल यांच्या कंपनीने येथे सीजे हाऊस नावाची 15 मजली इमारत बांधून इमारतीमध्ये तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावरील फ्लॅट मिर्ची याची पत्नी हजरा इक्बाल हिच्यासह जुनैद आणि आसिफ या दोन मुलांच्या नावावर केले, असा आरोप आहे.