Wed, Apr 24, 2019 21:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्राचीला भोवली कॉलेजची मैत्री

प्राचीला भोवली कॉलेजची मैत्री

Published On: Aug 06 2018 1:41AM | Last Updated: Aug 06 2018 1:22AMठाणे : नरेंद्र राठोड   

एकतर्फी प्रेमप्रकरणातून 20 वर्षीय प्राची झाडे या तरुणीची हत्या करणार्‍या आकाश पवार (25) या माथेफिरू तरुणास पोलिसांनी अटक केल्यानंतर तो पोलिसांसमोर रडल्याचे वृत्त आहे. दरम्यान आरोपी आकाश पवार यास रविवारी ठाणे न्यायालयात हजर केले. यावेळी ठाणे सत्र न्यायालयाने त्यास 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत प्राचीसोबत त्याची ओळख काही महिन्यांपूर्वी ठाण्याच्या बेडेकर कॉलेजमध्ये झाली होती. बी कॉमचे शिक्षण घेत असलेल्या प्राचीने सुरुवातीला एक मित्र म्हणून आरोपी आकाशशी मनमोकळे बोलत होती. याच मनमोकळे बोलण्याला प्रेम समजून आकाश तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. 

कॉलेज, कामाच्या ठिकाणी तिचा सतत पाठलाग करणे, वारंवार फोन करणे आदी प्रकार आकाशकडून होऊ लागल्याने प्राचीने त्याच्यासोबतचे मैत्रीचे संबंधदेखील तोडले. परंतु स्वतःला मोठे प्रेमवीर समजणार्‍या माथेफिरू आरोपीने प्राचीचा सतत पाठलाग सुरूच ठेवत तिला त्रास द्यायला लागला. दरम्यानच्या काळात तर त्याचा कहर इतका वाढला होता की त्याने प्राची पार्टटाइम काम करीत असलेल्या कापूरबावडी येथील शादी डॉट कॉम या कार्यालयात घुसून तिला धमकावण्याचा व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या सततच्या जाचाला कंटाळून प्राचीने कापूरबावडी पोलिसात धाव घेऊन त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी एनसी दाखल करीत आकाश यास समज दिला. तर त्यानेदेखील आता प्राची हिचा पाठलाग करणार नाही व तिला अजिबात त्रास देणार नाही अशी कबुली दिली होती. त्यामुळे हे प्रकरण समजदारीने मिटवण्यात आले. मात्र हेच समजदारीने मिटलेले प्रकरण नंतर प्राचीच्या जीवावर बेतेल याची पुसटशी कल्पनादेखील तेव्हा पोलिसांना अथवा प्राचीच्या कुटुंबीयांना आली नव्हती. 

पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर देखील माथेफिरू आरोपीचा त्रास प्राची यास होतच राहिला, किंबहुना तो जास्तच वाढला. दरम्यान, पोलिसात तक्रार करून देखील माझे काहीही वाकडे झाले नाही अशा अविभार्र्वात आता हा माथेफिरू प्रेमवीर वागू लागला होता. तर थेट पोलिसात तक्रार करूनदेखील काहीही उपयोग झाला नसल्याने आता नेमके कोणते पाऊल उचलावे या विवंचनेत प्राची सापडली होती. त्यामुळे आरोपीकडे दुर्लक्ष करण्यावाचून तिच्याकडे पर्यायच उरला नव्हता. परंतु प्राचीचे हेच दुर्लक्ष करणे आरोपीस अधिक डिवचत गेले. अगदी आपल्या दुचाकीवर ‘पिल्या बोल ना’ असे लिहून फिरणारा हा माथेफिरू शनिवारी सकाळ पासूनच प्राचीच्या मागावर होता. पोलिसांनी काढलेल्या मोबाईल लोकेशननुसार तो घटनेच्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून प्राचीच्या घराजवळ फिरत असल्याचे समोर आले आहे. प्राची 10.45 मिनिटांनी आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी अ‍ॅक्टिव्हा दुचाकीने निघाली तेव्हा तिच्या घराशेजारीच दबा धरून बसलेल्या आरोपींने आपल्या पल्सर दुचाकीने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. 

कोपरीकडून सिडको मार्गे तो तिचा पाठलाग करीत होता. त्याने मार्गात प्राची सोबत बोलण्याचा देखील प्रयत्न केला मात्र तिने त्यास भीक घातली नाही. अखेर त्याने पूर्व द्रुतगती मार्गावरील आरटीओ ऑफिससमोरील काहीशा निर्जन असलेल्या ठिकाणी प्राचीवर धारदार चाकूने पाठीमागून हल्ला चढवला. त्याने प्राचीच्या पाठीवर खोलवर वार केल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. इतक्यावर न थांबता माथेफिरूने तिच्या पोटावर व गळ्यावरदेखील वार केले. पूर्ण ताकतीने वार झाल्यामुळे प्राची गंभीर जखमी झाली. याच वेळी या माथेफिरूने स्वतः देखील एका भरधाव बस खाली येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यातून बचावला व रिक्षा पकडून घटनास्थळावरून फरार झाला. दुसरीकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्राचीच्या मदतीसाठी मात्र कुणीही पुढे आले नाही. एक - दोन तरुण मदतीसाठी पुढे सरसावले व त्यांनी प्राचीला दवाखान्यात नेण्यासाठी 10 ते 15 रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही रिक्षावाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्राचीला आपल्या रिक्षातून नेण्यास तयार झाला नाही. अखेर रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने प्राचीची प्राणज्योत मालवली.