Fri, Jul 10, 2020 20:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : तरुणाची झोपडपट्टीतून थेट इस्त्रोत झेप

मुंबई : तरुणाची झोपडपट्टीतून थेट इस्त्रोत झेप

Published On: Dec 02 2017 1:29AM | Last Updated: Dec 02 2017 2:36PM

बुकमार्क करा

पवई  : वार्ताहर

पवईच्या फिल्टर पाडा झोपडपट्टीमधून एका पंचवीस वर्षीय तरुणाने थेट इस्रोत शास्त्रज्ञ म्हणून  गरुडझेप घेतली आहे. प्रथमेश सोमा हिरवे असे या तरुणाचे नाव असून तो पवई फिल्टर पाडा झोपडपट्टीत मरोळ येथील पालिकेच्या शाळेत शिक्षक असलेले वडील सोमा आणि आई इंदू यांच्या समवेत राहतो.

मराठी माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रथमेश आणि त्याच्या चुलत भावाची कलचाचणी पालकांनी घेतली होती. प्रथमेश इंजिनियरिंग करू शकत नाही, असे तज्ज्ञांनी सांगितल्यावर प्रथमेशच्या ते जिव्हारी लागले आणि आता इंजिनीयर होऊनच दाखवायचे, असा त्याने निश्‍चय केला. 2007 साली त्याने विलेपार्ले येथील भागुबाई मफतलाल पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगसाठी प्रवेश मिळविला. मराठीतून शिक्षण घेतलेल्या प्रथमेशला इथले इंग्रजी शिक्षण जड जाऊ लागले. त्याने बॅक बेंचर होणे पसंत केले. वर्षभरानंतर त्याने पुन्हा वर्गात पुढे येऊन इंग्रजीची समस्या बिनधास्तपणे शिक्षकांपुढे मांडली. शिक्षकांनी त्याला डिक्शनरी आणि इंग्रजी पुस्तके वापरण्याचा सल्ला दिला. याचा मोठा फायदा प्रथमेशला झाला. त्याने डिप्लोमा पूर्ण करून एल एन्ड टी तसेच टाटा पॉवरसारख्या कंपनीमध्ये आपली इंटर्नशिप केली. या वेळी त्याला काही चांगल्या मार्गदर्शकांनी डिग्री शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. प्रथमेशने नवी मुंबईच्या इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवीही संपादन केली. प्रचंड ,मेहनत आणि सततचा अभ्यास यांच्या जोडीला एकाग्रता प्रथमेशने ढळू दिली नाही. याच दरम्यान त्याने 2016 साली इस्रोमध्ये काम करण्याची संधी मिळावी म्हणून अर्ज केला होता. त्याने यूपीएससीची परीक्षाही दिली होती. परंतु त्याचा ओढा इस्रोकडे होता. त्याने पुन्हा मे 2017 मध्ये इस्रोकडेे अर्ज केला आणि आपले स्वप्न साकार केले आहे. काही दिवसातच चंदीगढ येथे तो इस्रोचा इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून रुजू होत आहे.

सध्या त्याचे सातार्‍यातील दहीगाव येथे सत्कार समारंभ आणि कौतुक सोहळे पार पडत आहेत. प्रथमेशच्या या कामगिरीबाबत प्रथमेशच्या आईवडिलांना मोठा अभिमान वाटतो आहे.मुलाने दिवस रात्र केलेल्या मेहनतीला खर्‍या अर्थाने फळ मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. प्रथमेशला आता स्वतःच्या कुटुंबाला एक चांगले घर आणि चांगले जीवनमान देण्याची इच्छा असून ती तो लवकरच पूर्ण करणार आहे. पवई च्या फिल्टरपाडा येथील झोपडपट्टी मधील एका तरुणाने फक्त जिद्द आणि मेहनतीच्या जिवावर एवढे मोठे यश मिळविल्याने मुंबईभरच नव्हे तर सातार्‍यातही  त्याचे कौतुक होत आहे.