Mon, May 20, 2019 11:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नीरव मोदीकडे आणखी एका देशाचे नागरिकत्व?

नीरव मोदीकडे आणखी एका देशाचे नागरिकत्व?

Published On: Feb 17 2018 9:24AM | Last Updated: Feb 17 2018 9:39AMमुंबई : वृत्तसंस्था

पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीचा पासपोर्ट तात्पुरात रद्द करण्यात आला असला तरी त्याच्याकडे आणखी एका देशाचे कायमस्वरूपी नागरिकत्व असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन वर्षांत नीरवचे वास्तव्य जास्त काळ अमेरिकेतच असून भारतात येण्याचे प्रमाणही त्याने कमी केले होते. त्याच्याकडे बेल्जियमचा पासपोर्ट असण्याचीही शक्यता आहे.

नीरव मोदी, त्याची पत्नी अमी, भाऊ निशाल आणि व्यावसायिक भागीदार मेहूल चोक्सी यांनी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात भारतातून पळ काढला होता. स्वित्झर्लंडच्या दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेनंतर तो कुठेही दिसलेला नाही. अमीने अमेरिकेचे नागरिकत्व घेतले असून निशाल बेल्जियमचा नागरिक आहे. नीरव मोदीचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. मात्र, प्रामुख्याने तो अमेरिकतेच राहतो आणि प्रवास करताना बेल्जियमचा पासपोर्ट बाळगतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारतात बर्‍याचवेळा तो येत असला तरी गेल्या दोन वर्षांपासून त्याने हे प्रमाण कमी केले होते. आपल्याकडे भारतात जाण्यासाठी वेळ नसल्याचे तो सांगत असे. परराष्ट्र मंत्रालयाने त्याचा भारताचा पासपोर्ट रद्द केला असला तरी त्याचा कितपत परिणाम होईल, याबाबतही शंका व्यक्‍त केली जात आहे. सगळा पैसा परत करण्याचे लेखी आश्‍वासन मोदीने बँकांना दिले असले तरी त्यावर बँकांचाही विश्‍वास नाही.

विक्रीवर परिणाम

दरम्यान, या घोटाळ्यामुळे नीरव मोदी ब्रँडच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता बाजारातून व्यक्‍त होत आहे. सध्या त्याच्या विविध कंपन्यांचे मूल्य सहा हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

मेहूल चोक्सी आयटीच्या रडारवर

पीएनबी घोटाळ्यातील आणखी एक आरोपी मेहूल चोक्सी 2012 पासून आयकर विभागाच्या रडारवर आहे. कर चुकवेगिरी करून मोठ्या प्रमाणावर सोने आणि हिरे भारतात आणल्याचा आरोप त्याच्यावर आहे. माहिती अधिकाराखाली मनोरंजन एस. रॉय यांनी मुंबई कस्टम विभागाकडे यासंदर्भात विचारणा केली होती. त्यावर्षी अनेक भारतीय कंपन्यांनी सीमाशुल्क चुकवून मोठ्या प्रमाणावर सोने भारतात आणले होते. यात मेहूल चोक्सीच्या गीतांजली जेम्सचाही समावेश होता. या कंपनीने 750 किलो सोन्याच्या वस्तू, 171 किलो सोने एक रुपयाही शुल्क न भरता आयात केल्याचा आरोप आहे. त्यावर्षी चोक्सीच्या कंपन्यांनी एकूण 1,103 किलो सोने आयात केले होते. यानंतर आयकर महासंचालक (तपास) यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. काका असलेल्या चोक्सीकडेच नीरव मोदीने हिरे व्यवसायाचे धडे घेतले आहेत.