Thu, Apr 18, 2019 16:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोर्ट ट्रस्टचा भाग सर्वसामान्यांना खुला : मुख्यमंत्री

पोर्ट ट्रस्टचा भाग सर्वसामान्यांना खुला : मुख्यमंत्री

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 12 2018 1:34AM

बुकमार्क करा
मुंबई : खास प्रतिनिधी

मुंबईत सध्या जळी, स्थळी, आकाशी आणि पाताळीदेखील विकासाची कामे सुरू असून मुंबईच्या पूर्व किनार्‍याचाही कायापालट होत आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसमुळे देश-विदेशातील अधिकाधिक पर्यटक मुंबईत येतील आणि जीडीपीमध्येही वाढ होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. देशातील पहिल्याच आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसच्या भूमिपूजनानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे भूमिपूजन झाले. 

या टर्मिनसमुळे पूर्वी फक्त खास लोकांसाठी खुला असलेला मुंबई पोर्ट ट्रस्टचा भाग आता सर्वसामान्यांंसाठी खुला होत असून आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस, कोस्टल रोड, सी प्लेन, रोरो सेवा, प्लोटिंग रेस्टॉरन्ट अशा विविध प्रकल्पांचा लाभ त्यांनाही घेता येणार आहे.

पोर्टच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती देण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न  सागरमाला अभियानातून साकार होत आहे. मुंबईतील रोरो टर्मिनल चे काम येत्या 25 मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलपासून ही सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या सेवेद्वारे मांडवा, नेरुळ येथे वाहने गेल्यास वेळ आणि इंधनाची बचत होऊ शकेल. सेझमधून जेएनपीटीमध्ये मोठी गुंतवणूक येत असून त्यामुळे राज्याच्या जीडीपीमध्ये वाढ होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

मेट्रोच्या कामातून निघणार्‍या मातीचा उपयोग करून सागरी भरावावर उद्यान तयार करण्याची सूचना नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात केली, त्यावर बोलताना मुंबईच्या विकास आराखड्यास मान्यता देताना या प्रकल्पाला मान्यता देण्याचे आश्‍वासन फडणवीस यांनी दिले. यावेळी कोचीन शिप यार्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यामध्ये जहाज दुरुस्तीबाबत सामंजस्य करार करण्यात आला.