Fri, Mar 22, 2019 05:31
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › १६ वर्षीय मुलीचे अश्‍लील फोटो काढून उकळले १.१५ लाख

१६ वर्षीय मुलीचे अश्‍लील फोटो काढून उकळले १.१५ लाख

Published On: Dec 14 2017 2:05AM | Last Updated: Dec 14 2017 1:20AM

बुकमार्क करा


मुंबई : अवधूत खराडे

इन्स्टाग्रामवरुन ओळख झालेल्या तरुणाशी मैत्री करणे अंधेरीतील एका बड्या व्यापार्‍याच्या 16 वर्षीय मुलीला चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाने तिच्याशी अश्‍लील चाळे करून त्याचा एक व्हिडीओ बनवला आणि हा व्हिडीओ सोशल मिडियावर टाकण्याची धमकी देत तब्बल 1 लाख 15 हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन वर्सोवा पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

अंधेरी पश्‍चिमेकडील सातबंगला, बॉन बॉन लेन परिसरात राहात असलेल्या बड्या व्यापार्‍याची 16 वर्षीय मुलगी येथील एका नामांकीत शाळेमध्ये शिकते. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आरीफ आसीफ खान (19) या तरुणाने तिला इन्स्टाग्रामवर फॉलो केले. आरीफचे स्टायलिस्ट फोटो बघून भुरळ पडलेल्या या मुलीने त्याची रिक्वेस्ट स्विकारली. इन्स्टाग्रामवर एकमेकांचे फोटो लाईक करता-करता दोघांमध्ये चॅटींग सुरू झाली. चॅटींगमधून झालेल्या मैत्रीनंतर आरीफने या मुलीला भेटण्यासाठी बोलावले. मुलगी गर्भश्रीमंत असल्याचे आरीफला माहित होते. मात्र आरीफच्या मनातील डाव या मुलीला ओळखता आला नाही. 

भेटायला बोलावलेल्या ठिकाणी ही मुलगी येताच आरीफने तिच्यासोबत अश्‍लिल चाळे करत, तिच्या नकळत एक व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ या मुलीला दाखवत तो सोशल मिडियावर प्रसारीत करण्याची धमकी देत आरीफने तिच्याकडे पैसे आणि दागिन्यांची मागणी केली. आरीफकडे आपला व्हिडीओ असल्याने ही मुलगी चांगलीच घाबरली होती. तिने आरीफला टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आरीफने तिला धमकावत गेल्या वर्षभरात तिच्याकडून तब्बल 1 लाख 15 हजार रुपये उकळले.

मुलगी शाळेत शिकत असतानाही तिचा खर्च वाढल्याने ही बाब तिच्या आई-वडिलांच्या नजरेत आली. त्यांनी तिच्याकडे विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र घाबरलेली ही मुलगी काहीच बोलत नव्हती. अखेर आईने तिला विश्‍वासात घेतल्यानंतर मुलीने आपल्यासोबत घडलेल्या प्रकार सांगितला. यावर मुलीच्या वडिलांनी वर्सोवा पोलीस ठाणे गाठून याची तक्रार दिली. अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा उठवत आरोपी आरिफने हे कृत्य केले असल्याने पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगासह पोक्सोच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.