Thu, May 23, 2019 21:11
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधान परिषदेच्या सहा जागांसाठी आज निवडणूक

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी आज निवडणूक

Published On: May 21 2018 1:55AM | Last Updated: May 21 2018 1:55AMमुंबई : खास  प्रतिनिधी

एकीकडे शिवसेना आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा पण करून रोजच्या रोज भाजपवर टीकेचा भडिमार करत असताना आणि कर्नाटकात ओढवलेल्या प्रसंगामुळे भाजप संत्रस्त झालेला असताना महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सहा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या निवडणुका स्वबळावर लढत असले, तरी त्यांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केलेले नाहीत. राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे कधी नव्हे, ते या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले असल्याने या निवडणुकीच्या निकालांवर सेना-भाजप आणि काँगेे्रस-राष्ट्रवादी यांच्यातील संबंधात सुधार-बिघाड होणे अवलंबून आहे. मात्र, या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी यांची चांगलीच कसोटी लागणार असून, शिवसेनेपुढेही आव्हान आहे.

सिंधुदुर्ग - रत्नागिरी - रायगड, नाशिक, अमरावती, परभणी-हिंगोली, वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली आणि लातूर - बीड - उस्मानाबाद या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांचे नगरसेवक हे या निवडणुकीत मतदान करणार असल्याने कुठे कुणाचे संख्याबळ किती आहे, हे स्पष्ट आहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून, त्यानुसार सिंधुदुर्ग - रत्नागिरी - रायगड (कोकण), नाशिक आणि लातूर - बीड - उस्मानाबाद या तीन जागा राष्ट्रवादीला, तर अमरावती, परभणी - हिंगोली आणि वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली या जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. मात्र, भाजप आणि शिवसेना यांच्यात युती नसली, तरी त्यांनी एकमेकांविरोधात उमेदवार देण्याचे टाळले आहे.  कोकण, नाशिक आणि परभणी - हिंगोलीमधून शिवसेना आणि अमरावती, वर्धा - चंद्रपूर, लातूरमधून भाजप काँग्रेस - राष्ट्रवादीशी टक्‍कर घेत आहे.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे भाऊ-बहीण लातूर - बीड - उस्मानाबाद या मतदारसंघात पुन्हा एकदा समोरासमोर आले असून, दोघांनाही आपापल्या पक्षातली पत सांभाळण्याठी झगडावे लागणार आहे. भाजपने राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना उमेदवारी दिली असून, राष्ट्रवादीने ऐनवेळी दगाफटका झाल्यानंतर अपक्षाला पाठिंबा दिला आहे. बीड जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांच्या अपात्रतेला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्थगिती दिल्याने धनंजय मुंडे यांना झटका बसला असला, तरी काँग्रेसने मनापासून साथ दिली, तर भाजपला विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागेल. अमरावती तसेच वर्धा - चंद्रपूर या दोन्ही मतदारसंघात भाजपकडे पुरेशी ताकद असून हिंगोलीमध्ये काँग्रेसचे पारडे जड आहे.