Wed, Jul 08, 2020 19:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मतदान केंद्रांना गळती!

मतदान केंद्रांना गळती!

Last Updated: Oct 21 2019 1:11AM
मुंबई :

नागपाड्यामधील मस्तान वायएमसीए बास्केट स्टेडिअममध्ये उभारलेल्या मतदान केंद्रांचे रविवारी टिपलेले हे दृश्य. मुंबादेवी विधानसभा मतदान संघातील मतदार सोमवारी येथे मतदानाचा हक्क बजावतील. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशीच येथे पावसामुळे मोठ्याप्रमाणावर गळती सुरू झाली. वीजेच्या वायर, पंखे आणि ट्युब लाईट्सवरही पाणी टिपकत होते. गळतीमुळे दुपारपर्यंत इथे कोणतेही काम रविवारी होऊ शकले नाही. सोमवारीही असाच पाऊस कोसळत राहिला तर मतदानाची सारीच तयारी पाण्यात जाण्याची भीती आहे.    झोनल अधिकारी प्रविण साळूंखे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. तुम्ही वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क करा, याबद्दल मला काहीही बोलायचे, असे ते म्हणाले. (छाया : अजिंक्य सावंत )

निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई शहरातील विविध 10 मतदारसंघातील पहिल्या, दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावरील एकूण 594 मतदान केंद्र यंदा तळमजल्याला हलवण्यात आली आहेत. संबंधित सर्व मतदान केंद्रे ही 120 ठिकाणी उभारलेल्या मंडपात समाविष्ट केलेली आहेत. राज्यभरात मतदानावर पावसाचे संकट असल्याने शहरातील मंडप वॉटरप्रूफ असल्याचा दावा जिल्हाधिकार्‍यांनी केला आहे. मात्र सोमवारी मुसळधार पाऊस आल्यास हे मंडप कितपत तग धरतील, असा प्रश्न निर्माण झाला असून मोकळ्या मैदानात उभारलेल्या या मंडपांमध्ये मतदान यंत्रांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.