Sun, May 26, 2019 14:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पडलेल्या पुलावरही राजकारण; रेल्वेने हात झटकले

पडलेल्या पुलावरही राजकारण; रेल्वेने हात झटकले

Published On: Mar 15 2019 1:45AM | Last Updated: Mar 15 2019 1:16AM
मुंबई : प्रतिनिधी 

या पूलाचे स्ट्रक्‍चरल ऑडीट करण्यात आले होते. त्यानंतर या पूलाची किरकोळ दुरुस्ती करण्याची शिफारस करण्यात आली होती मात्र हा पूल कोसळला त्यामुळे स्ट्रक्‍चरल ऑडीटवरच शंका निर्माण होत आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये आर्थिक मदत करण्यात यईल. तर, जखमींना 50 हजार रुपये आर्थिक मदत  व त्यांचा संपुर्ण वैद्यकीय खर्च देखील राज्य सरकार उचलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईमध्ये पुल कोसळण्याच्या घटना घडतच आहेत. गर्दीच्या वेळीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल कोसळला.आता अपघातानंतर या पुलाचे ऑडिट झाले नव्हते असा आरोप करण्यात येत आहे. मात्र या पुलाचे ऑडिट झाले होते आणि पुलाच्या डागडुजीचा प्रस्ताव होता ती करण्यात येणार होती, पण तोपर्यंत  दुर्घटना घडली अशी माहिती अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. हा पूल सुमारे 100 वर्षांपेक्षा जास्त काळ जुना आहे मात्र या पुलाचं ऑडिट झालं नव्हतं असा आरोप आता होतो आहे. मात्र या आरोपात काही तथ्य नाही असं सावंत यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे कोसळलेल्या पादचारी पुलाचे ऑडिट झाले नव्हते त्यामुळेच ही दुर्घटना घडली, म्हणून याला रेल्वे जबाबदार आहे, असा आरोप स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी केला. एमआयएम आमदार वारीस पठाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली. स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात, पण पुलासाठी सरकारकडे पैसे नाहीत, लोकांच्या सुरक्षेचे काय ?, असा संतप्त सवाल आमदार वारिस पठाण यांनी विचारला.

रेल्वे आणि मुंबई मनपा या प्रकरणाची संयुक्‍त चौकशी करणार असून,  पुलाची जबाबदारी नेमकी कोणाकडे होती हे चौकशी नंतर स्पष्ट केले जाईल, असे शिक्षण मंत्री  विनोद तावडे यांनी सांगितले. या घटनेला पालिका प्रशासन जबाबदार असून या घटनेची सखोल चौकशी सरकारमार्फत करण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर केली. 

डोंबिवलीच्या 3 पारिचारिकांचा पुलाखाली मृत्यू

सीएसएमटी स्टेशनजवळील पूल दुर्घटनेत बळी गेलेल्या पाच जणांमध्ये तीन डोंबिवलीकर परिचारिकांचा समावेश आहे. अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या दोन्ही परिचारिका गोकूळदास तेजपाल रूग्णालयात कार्यरत होत्या. तर भक्ती शिंदे या सेंट जॉर्ज रूग्णालयात कार्यरत होत्या. जीटी रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद तायडे यांनी ही माहिती दिली.

जीटी रुग्णालयातील कर्मचारी वनिता जामखंडे यांनी सांगितलं, अपूर्वा प्रभू या ओटी विभागात तर रंजना तांबे ऑर्थो विभागात कार्यरत होत्या. दोघी रात्रपाळीसाठी कामाला येत असतानाच सीएसएमटी स्टेशनजवळील पादचारी पुलाचा मधला भाग कोसळला आणि त्यात त्यांचा बळी गेला.  

घाटकोपरचा बेल्टवाला जाहिद गेला

घाटकोपर ः सीएसएमटी स्थानक पूल दुर्घटनेत घाटकोपरच्या नित्यानंदनगर विभागात राहणार्‍या जाहीद सिराज खान (32) याचा मृत्यू झाला.  त्याचा घाटकोपर स्थानकाजवळ बेल्टचा धंदा होता. जाहीद वडील सिराज खान यांच्यासह क्रॉफर्ड मार्केटमध्ये सामान आणण्यास गेला होता. त्याचवेळी त्याला मृत्यूने गाठले. वडील गंभीर जखमी झाले आहेत. जाहीद याला दोन लहान मुले असून त्याच्या मृत्यूने विभागावर शोककळा पसरली आहे.

‘सेल्फि’श मुंबईकरांना आवरा!

मी टॅक्सीचालक चर्चगेट वरून माहीम ला जात असताना टॅक्सीवर या पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आणि टॅक्सीचे नुकसान झाले. मात्र पॅसेंजर सुखरूप आहे. दोन मिनिटे डोळ्यासमोर साक्षात मृत्यू दिसल्याचे टॅक्सीचालक मोहम्मद अंसारी म्हणाले.

मी कामाहून घरी जाताना याच पुलाच्या पायर्‍या चढत होतो. त्याच वेळी पुलाचा काही भाग कोसळला. मी तातडीने पुलाखाली धावलो. लोकांना सोबत घेतले आणि पोलिसांच्या वाहनातून 8 जणांना जीटी रुग्णालयात दाखल केले असे नितीन यादव यांनी सांगितले. 

पूल कोसळताच अनेक हात मदतीला धावले. अत्यावश्यक सेवांची वाट न बघता तो ढिगारा हटविण्याचे काम सुरू केले. रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना रुग्णालयात हलविण्यात आले. हळूहळू बघ्यांचीच गर्दी वाढू लागली आणि ती हटवताना पोलिसांनाही कष्ट पडले. 

अनेकांनी नागरिक सेल्फी काढण्यात दंग झाले होते. काही विक्षिप्त तर पूल कोसळला त्याच ठिकाणी उभे राहून सेल्फी काढण्यात दंग होते. शेवटी त्यांना पोलिसांनीच समज दिली. शेजारी असलेल्या भेळ वाल्याकडून भेळ घेत ती खाण्यात गुंग असलेले दोन तरुण घटना स्थळी भेळ खात खात चौकशी करू लागले. त्यांनाही लोकांनी पिटाळले. 

अनेक नागरिकांची पाकिटे व मोबाईल चोरण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू होता. अनेक जण उभ्या असलेल्या पोलिसांकडे आपल्या तक्रारी देण्यासाठी येत होते. त्यामुळे पोलिसांकडून घटनास्थळी बॅरीकेड्स लावण्यात आले. पादचारी पुल पडल्यानंतर काही अतिउत्साही तरूणांनी पुलावर धाव घेतली. ही घटना पुलावरून बघण्यासाठी गर्दी  होऊ लागताच त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले.