Thu, Apr 25, 2019 11:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाप्पाच्या मंडपावरून राजकारण

बाप्पाच्या मंडपावरून राजकारण

Published On: Aug 31 2018 2:09AM | Last Updated: Aug 31 2018 1:38AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईत शिवसेना-भाजपातील श्रेयवादाची लढाई आजही सुरूच आहे. अगदी गणेश मंडप परवानगीच्या मुदतवाढीचा मुद्दाही शिवसेना-भाजपाने उचलून धरला आहे. शिवसेनेने बुधवारी गणेश मंडपाच्या परवानगीची मुदत 2 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. यावर भाजपाने मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने गुरूवारी मंडप परवानगीची मुदत 5 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली.

मुंबई शहरात गणेशोत्सवाचे महत्व गेल्या काही वर्षात वाढले आहे. गणेशोत्सवाशी लाखो मुंबईकर जोडले गेल्यामुळे या उत्सवात प्रत्यक पक्ष स्वत:ची छाप उठवण्यासाठी प्रयत्नशिल असतो. यात शिवसेना व भाजपा आघाडीवर आहेत. गेल्या काही दिवसापासून मुंबईतील सर्वाजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडप परवानगीवरून गणेशोत्सव मंडळ व पालिका प्रशासनात खटके उडत आहेत. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सव मंडळांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यंदा प्रथमच ऑनलाईन मंडप परवानगी दिली जात आहे. तरीसुध्दा अनेक मंडळांना मंडपाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे बुधवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव समन्वय समिती पदाधिकारी व पालिका प्रशासन यांच्यात मंडप परवानगीवरून एक बैठक पार पडली होती. या बैठकीत मंडप परवानगीची मुदत 2 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

भाजपाने गणेशोत्सव मंडळांबाबत मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेनेत नाराजीचे सूर उमटत आहेत. शिवसेनेने कधीही श्रेयासाठी काम केले नाही, त्यामुळे श्रेय घेणार्‍यांना फारसे महत्व देण्यात येत नसल्याचा टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मारला.