Mon, Mar 25, 2019 05:32
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विखे-पाटील यांच्या बंगल्यात पोलिसांची हेरगिरी

विखे-पाटील यांच्या बंगल्यात पोलिसांची हेरगिरी

Published On: Jan 26 2018 1:35AM | Last Updated: Jan 26 2018 1:22AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मंत्रालयासमोरील अ - 6 या शासकीय बंगल्यात पोलिसांच्या विशेष शाखा अधिकार्‍यांनी हेरगिरी केली. एकाही कर्मचार्‍याला न विचारता बंगल्यात प्रवेश केलेले हे अधिकारी पत्रकार आणि विखे-पाटील यांच्यातील संवाद व छायाचित्रे त्यांच्या वरिष्ठांना मोबाईलवरून पाठवित होते.

पत्रकारांसोबतचा संवाद संपल्यानतर दोन अनोळखी चेहरे आपल्यासमोर बसल्याचे विखे यांच्या लक्षात आले. त्यांनी हटकताच आपण एसबी-1 या पोलीस शाखेतील अधिकारी असल्याचा खुलासा सुभाष सामंत (सहायक पोलीस निरीक्षक) व बाजीराव सरगर (पोलीस नाईक) यांनी केला. या दोघांची देहबोली संशयास्पद वाटल्यामुळे विखे यांनी तुम्हाला येथे कुणी पाठवले, या बंगल्यात येण्याआधी तुम्ही कोणाची परवानगी घेतली आहे का, असे सवाल विचारले. मात्र, याबाबत आम्ही कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.

तुम्हाला कोणत्या विभागाने येथे येण्यासाठी सूचना दिली आहे का, या प्रश्‍नावरही ते अधिकारी निरुत्तर झाले. विखे-पाटील यांनी तत्काळ पोलीस आयुक्‍त दत्ता पडसळगीकर यांच्याशी संपर्क केला. पोलिसांच्या हेरगिरीवर पडसळगीकर यांच्याकडे संताप व्यक्‍त केला. हा प्रकार निंदनीय असून सरकारच्या सूचनांशिवाय हा प्रकार घडलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला. केवळ टेहळणीच नाही, तर माझे फोनही टॅप होत असल्याचेही विखे-पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.