Wed, Jul 17, 2019 07:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसांची मुले आयआयटी, एमबीबीएसच्या यादीत

आनंदवार्ता: पोलिसांची मुले आयआयटी, एमबीबीएसच्या यादीत

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 1:53AM

बुकमार्क करा
नवी मुंबई : राजेंद्र पाटील 

पोलिसाची नोकरी म्हणजे पाठीवर बिर्‍हाड. कामाच्या वेळा, सततच्या बदल्या. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे आणि संगोपनाकडे आणि स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष ओघाने आलेच. पहिल्या फळीतील अधिकारी असेल तरच मोठा शैक्षणिक कोर्स, अन्यथा पदवी किंवा तांत्रिक शिक्षण आणि मग नोकरी. पोलीस दलातल्या कर्मचार्‍यांच्या मुलांची अपवाद वगळता ही अवस्था. मात्र आता या चित्रात बदल होऊ लागला आहे. अनेक मुले उच्च शिक्षणाची वाट चोखाळू लागली आहेत. आणि त्यांना पूरक ठरताहेत त्या विविध कल्याणकारी योजना. 

गृह खात्याने पोलिसांच्या बरोबर त्यांच्या पाल्यांचेही कल्याण करण्यासाठी सुरु केलेल्या योजनेचा लाभ राज्यातील तब्बल 1285 विद्यार्थ्यांनी घेतला. आणि पोलिसांच्या मुलांनी  एमबीबीएस, इंजिनीअरिंग पदविका, सीए, एमबीए आणि आयआयटी ईटीसीपर्यंत झेप घेतली. याव्यतिरिक्त पोलीस कर्मचार्‍यांसाठीही अनेक कल्याणकारी योजना असून, याअंतर्गत गेल्या वर्षभरात कल्याणकारी योजनेतून 4 कोटी 91 लाख 69 हजार रुपये खर्च करण्यात आला. 

पोलिसांच्या पाल्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या 10 योजनांचा फायदा राज्यातील 1285 विद्यार्थ्यांना सन 2016-17 या वर्षात झाला आहे. या योजनेतंर्गत उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज, उच्चतम शिक्षण, दप्‍तर योजना, स्कॉलरशिप, पुस्तक अनुदानासह इतर अनुदान या योजनेतून वाटप करण्यात आले. 30 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांच्या वेळी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी ही माहिती दिली. 

पोलीस पाल्यांसाठी उच्च शिक्षण प्रोत्साहन योजनेअंतर्गत 26 हजार रुपये स्कॉलरशिप देण्यात येते. याअंतर्गत गेल्या वर्षी 132 विद्यार्थ्यांना 33 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. उच्च शिक्षणासाठी 50 हजार रुपये प्रमाणे 98 लाख 90 हजार रुपये बिनव्याजी कर्ज 198 विद्यार्थ्यांना देण्यात आले. दप्‍तर योजनेसाठी 1087 विद्यार्थ्यांना 5 लाख 43 हजार 500 रुपयांचे वाटप करण्यात आले. वैद्यकीय अनुदानावर 1 कोटी 43 लाख 22 हजार 810 रुपये खर्च पोलिसांच्या कुटुंबावर करण्यात आला. महाराष्ट्र दर्शन योजनेसाठी 1785 कर्मचार्‍यांनी अर्ज केले होते. त्यांना 17 लाख 85 हजार रुपये खास पिकनिक निधी देण्यात आला. स्मार्ट पोलीसिंग  योजनेअंतर्गत 45 वर्षावरील कर्मचारी व अधिकारी यांना वैद्यकीय तपासणीसाठी 1 कोटी 30 लाख रुपये कल्याणकारी अनुदान निधीतून देण्यात आले. पुस्तक अनुदान योजनेअंतर्गत  पाचवी ते उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक पोलीस पाल्यांना 1 हजार ते 15 हजार रुपये पुस्तक अनुदान स्वरुपात 64 लाख 17 हजार 950 रुपये देण्यात आले असून या वर्षीपासून या अनुदानात 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय पोलीस कल्याणकारी समितीने घेतला आहे.