होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बापलेक रिक्षावाल्यांनी घेतला पोलिसाचा चावा

बापलेक रिक्षावाल्यांनी घेतला पोलिसाचा चावा

Published On: Mar 03 2018 6:31PM | Last Updated: Mar 03 2018 6:31PMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर बेशिस्तपणे पार्क करत वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या  रिक्षावर कारवाई करणाऱ्यावरून पोलिस आणि रिक्षाचालकांमध्ये वाद झाले. यावेळी तीन वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना दोघा रिक्षावाल्या बाप-लेकाने चावा घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पोलिस विरूद्ध उन्मत्त रिक्षावाल्यांचा वाद उभा राहिला आहे.
कल्याण वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस नाईक मोहसीन अन्वर शेख हे शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक नियोजनाचे काम करत होते.

यावेळी स्टेशन समोरील रस्त्यावर (एमएच 05 सीजी ३१३३) क्रमांकाची रिक्षा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी होती. यावेळी पोलिस नाईक शेख यांनी या रिक्षाचा चालक संजय चौधरी याला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. मात्र त्यामुळे संतापलेल्या चौधरी याने शेख यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धाऊन गेले. तू कोण रे दीडदमडीचा पोलिसवाला म्‍हणत पोलिसांना धमकी देण्यात आली. यावेळी शेख यांच्या मदतीसाठी आलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ यांच्याशी देखील त्याने झटापट करून त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला. या दरम्यान शेख आणि वाघ यांच्या मदतीसाठी आलेल्या पोलिस शिपाई तखीक याला देखील रिक्षावाला संजय चौधरी याचा मुलगा आकाश याने मारहाण करत शिपाई तखीक यांच्या हाताला कडाडून चावा घेतला. या प्रकरणी पोलिस नाईक मोहसीन शेख यांच्या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानुसार हल्लेखोर संजय राजाराम चौधरी (४३) व त्याचा मुलगा आकाश (१९) या दोघा बाप-लेकाला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.