Wed, Mar 20, 2019 03:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलीस बदल्यांना ‘इलेक्शन टच’!

पोलीस बदल्यांना ‘इलेक्शन टच’!

Published On: Jul 29 2018 1:23AM | Last Updated: Jul 29 2018 1:11AMमुंबई : अवधूत खराडे

मुंबईसह राज्य पोलीस दलातील बड्या अधिकार्‍यांच्या गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या बदल्या अखेर गृहमंत्रालयाने मार्गी लावताना मुंबईतील एका उच्चपदावर गेल्या काही वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या अधिकार्‍यासह बदल्यांच्या यादीत असलेल्या तब्बल 66 अधिकार्‍यांच्या बदल्या थांबविल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते. त्यामुळे करण्यात आलेल्या बदल्या या येत्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केल्याच्या चर्चा पोलीस दलात रंगू लागल्या आहेत.

पुढल्या वर्षी संपूर्ण देशभरात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस या निवडणुकांचे बिगूल वाजण्यास सुरुवातसुद्धा होईल. त्या पार्श्‍वभूमीवर मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी राजकारण्यांना पोलिसांच्याही इनपुटची बर्‍याच मोठ्याप्रमाणात मदत होते. सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाला या काळात आपल्या मर्जीतील पोलीस अधिकारी महत्त्वाच्या पोस्टिंगवर असण्याची इच्छा असते. यातूनच गेल्या काही महिन्यांपासून रखडवून ठेवलेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गृहमंत्रालयाने केल्याचे बोलले जात आहे.

केंद्रामध्ये गुप्तचर यंत्रणांमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या दोन अधिकार्‍यांना पुन्हा राज्य पोलीस दलामध्ये आणून त्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर नियुक्त करण्याची चांगले काम राज्य शासनाने केले आहे. मात्र हे करण्यासोबतच मुंबईतील आणखी एका महत्त्वाच्या पदाची जबाबदारी विश्‍वासाने एकाच अधिकार्‍यावर गेली चार वर्षे सोपविल्याने अनेक उलटसुलट चर्चा पोलीस दलात रंगू लागल्या. त्यात या अधिकार्‍याला पुन्हा एकदा मोठी मुदतवाढ मिळाल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही मुदतवाढ दिल्याच्या पोलीस दलातील चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

दक्षिण मुंबईतील अतिसंवेदनशील आणि महत्त्वपूर्ण अशा विभागात चांगले काम करणार्‍या अधिकार्‍याची बढतीने नवीन नियुक्ती करत उपनगरातील एक संपूर्ण विभाग मजबूत केला आहे. तसेच दादर, लालबाग, परळ, वरळी अशा भागांतील मतदारांचा कौल जाणून घेण्यासोबत या विभागात आपली ताकद वाढविण्यासाठीही शासनाने प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूरच्या जवळ असलेल्या एका अधिकार्‍याला पुन्हा मुंबईत आणले गेले आहे. तर सत्तेतील मित्र पक्षाने नुकत्याच दाखविलेल्या एका जिल्ह्यातील यशाच्या पार्श्‍वभूमीवर तेथेही मर्जीतील अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे.