भिवंडी : संजय भोईर
भिवंडी तालुक्यातील सरवली ग्रामपंचायत हद्दीतील लवली लेडीज ऑकेस्ट्रा बारवर कोनगाव पोलीसांनी कारवाई केली. यात मालकासह २३ बारबालांना अटक केली. मात्र, पोलीस स्टेशन येथे आणून त्यांना अश्लिल हावभाव केल्या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करत रात्रीच तात्काळ सोडून दिले. अशा पद्धतीनेच कारवाई होणार असेल तर मग हा फार्स पोलीस नक्की कशासाठी करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भिवंडी-कल्याण रस्त्यावरील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लेडीज बारचा धंदा फोफावला आहे. या व्यवसायाकडे पोलीस विभाग सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. कोनगाव पोलीस स्टेशन येथे याची प्रचिती आली. कोनगाव पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सरवली ग्रामपंचायत हद्दीतील लवली ऑकेस्ट्रा बार येथे छापा टाकला. यात तब्बल २३ बारबालांना आणि मालक मलिंदर सिंग यांना अटक केली. मात्र, त्यानंतर रात्री उशीरा बारबालांवर मुंबई पोलीस कायदा कलम ११०, ११७ नुसार तर मालक मलिंदर सिंग यावर ३३( W ) नुसार कारवाई करीत सोडुन दिले.
बारवरील अशा प्रकारची कारवाई करुनच हे प्रकरण थांबले नाही. बारच्या कर्मचाऱ्यांनी सर्व बारबालांना रिक्षा, ओमनी कारमध्ये अक्षरशः कोंबुन तेथून घालवले. या प्रकाराचे चित्रिकरण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींसोबत पोलीस स्टेशन परीसरातच अरेरावीची भाषा वापरुन कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला गेला.