Wed, Apr 01, 2020 07:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसआयटी चौकशीच्या मागणीची खबर दिल्लीला गेलीच कशी?

एसआयटी चौकशीच्या मागणीची खबर दिल्लीला गेलीच कशी?

Last Updated: Feb 19 2020 1:56AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

एल्गार प्रकरणाचा तपास एसआयटी नेमून करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची बैठक झाली. मात्र, या बैठकीनंतर काही तासांतच केंद्र सरकारने ही चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवली. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती इतक्या तत्परतेने केंद्राकडे कोणत्या अधिकार्‍याने पोहोचवली, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून एल्गार प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी नुकतीच केली होती. त्यानंतर काही तासांतच एल्गार परिषदेचा तपास केंद्राने एनआयएकडे सोपवला. त्याला पवार यांच्यासह काँग्रेसनेही विरोध केला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन हा तपास काँग्रेस व राष्ट्रवादीचा विरोध असतानाही एनआयएकडे सोपवला. मात्र, शरद पवारांनी कलम 10नुसार समांतर तपास सुरू ठेवण्याबाबत सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांना केल्या. त्यानुसार गृहमंत्र्यांनी अधिकार्‍यांची बैठक घेऊन समांतर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत मतभेद असल्याचे समोर आले आहेत.

मंगळवारी शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकारांसोबत चर्चा करून एल्गारप्रकरणी भाष्य केले. ते म्हणाले, एल्गार प्रकरण मला लोकांच्या समोर आणायचे आहे. राज्य सरकार काय तपास करायचा ते करेल. आपण त्यात पडणार नाही.

एल्गार परिषदेमध्ये 100 पेक्षा जास्त संघटना सहभागी झाल्या होत्या. केंद्र आणि राज्य सरकारचे विविध पुरस्कार मिळवलेले नामदेव ढसाळ यांच्या काही कवितांचे सुधीर ढवळे यांनी वाचन केले. पण पोलीस आणि मागच्या सरकारने अधिकाराचा गैरवापर करून त्यांच्यावर कारवाई केली. या कवितेचा आधार घेऊन त्यांना दोन वर्षे तुरुंगात टाकले. इतकेच नाही तर ढवळेंना जामीन मिळणार नाही, असे पुरावे सादर केले. त्यामुळे सुप्रीम कोर्टात त्यांना जामीन मिळाला नाही, असे सांगत पवारांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या दाखल्याचे वाचन केले. परिषदेला हजर नसलेल्या लोकांनाही या गुन्ह्यात गोवले. त्यामुळे एल्गारच्या तपासाबाबत काही पोलीस सहमत नाहीत. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासावरून महाराष्ट्र पोलीस दलाच्या लौकिकाला धक्का बसला आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या महाराष्ट्र पोलीस आणि पुणे पोलिसांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.