Thu, Apr 18, 2019 16:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलीस भरतीच्या चौघा महिला उमेदवारांना कारने उडवले

पोलीस भरतीच्या चौघा महिला उमेदवारांना कारने उडवले

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 09 2018 1:41AMविक्रोळी : वार्ताहर

पोलीस भरतीसाठी चाचणी देऊन पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडताना भरधाव मोटारने चार महिलांना उडवल्याची घटना विक्रोळी येथे घडली. या चारहीजणी जखमी झाल्या असून दोघींना गंभीर दुखापत झाली आहे. काजल करडे(19), दीपाली काळे(19), चित्राली पांगे(19), चैताली दोर्गे(19) अशी या चौघींची नावे असून, त्या पुण्याच्या शिरूरमधील शिरोळे अकादमीच्या विद्यार्थिनी आहेत. 

मुंबई पोलिस दलात शिपाई पदाची भरती प्रक्रियेतील मैदानी परीक्षा पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर ते मुलुंड पर्यंतच्या सर्व्हिस रोडवर सुरु आहे. विक्रोळी गोदरेज सिग्नल या ठिकाणी धावण्याची चाचणी घेण्यात येत आहे.  अपघातात जखमी झालेल्या चौघी ही मंगळवारी सकाळी आपली धावण्याची चाचणी पूर्ण करून पूर्व द्रुतगती मार्गावरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत होत्या. याचवेळी भरधाव वेगाने येणार्‍या चक 04 गघ 3261 या गाडीने या चौघींना जोरदार धडक दिली. जखमी झालेल्या चौघीना प्रथम विक्रोळीतील पालिकेच्या  महात्मा फुले रुग्णालयात आणि त्यानंतर सायन येथील टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील दीपाली आणि चित्रालीला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. मोटार चालक मोहम्मद  खालिद सईद शेख (20, मुंब्रा) याला विक्रोळी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर कलम 279,337,338 आणि मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षात अतिशय वेगात वाहने ये-जा करणार्‍या आणि प्रचंड उन्हाच्या झळा जाणवत असणार्‍या या मार्गावर शारीरिक चाचणी न घेता, मैदानांमध्ये या चाचण्या घेण्यात याव्यात, अशी मागणी होत असून या अगोदर काहींचे जीवदेखील गेल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु दरवर्षी ऐेन उन्हाळ्यात मुंबई पोलिसांची भरती आणि त्याची धावण्याची चाचणी याच मार्गावर होते.

Tags Mumbai, mumbai news, Police recruitment,  Four women candidate, car hit,