होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिद्रे बेपत्ता प्रकरणात अभय कुरुंदकर अटकेत

बिद्रे बेपत्ता प्रकरणात अभय कुरुंदकर अटकेत

Published On: Dec 07 2017 7:45PM | Last Updated: Dec 07 2017 8:07PM

बुकमार्क करा





ठाणे : प्रतिनिधी

दीड वर्षापासून कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्‍विनी गोरे-बिद्रे यांच्या बेपत्ता प्रकरणात अखेर पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यास नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी ठाण्यातून अटक केली. 

कोल्हापूरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी राजू गोरे या गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता आहेत. नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात रुजू होण्यासाठी त्या निघाल्या मात्र, तेथे पोहोचल्याच नाहीत. त्यानंतर अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी नवी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली. याच दरम्यान, अश्‍विनी आणि पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यात फोनवरून झालेली संभाषणाचे रेकॉर्डिंग अश्‍विनीचे पती राजू गोरे यांच्या हाती लागले. त्यात कुरंदकर हे अश्‍विनीला व त्यांच्या कुटुंबाला गायब करण्याची धमकी देत असल्याचे पुरावे होते. 

त्यानंतर अश्‍विनीच्या कुटुंबीयांनी कुरुंदकर यांच्या विरोधात नवी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अश्‍विनी बेपत्ता प्रकरणात कुरुंदकर हेच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आल्याने कुरुंदकर विरोधात कलंबोली पोलीस ठाण्यात भादवी 364, 506(2), 497, 323, 34 नुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल होवून देखील कुरुंदकर यांच्या विरोधात कुठलीही कारवाई न झाल्याने आणि अश्‍विनी हिचाही शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न न केल्याने अखेर ऑक्टोबर 2016 कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

उच्च न्यायालयाने देखील अश्‍विनी हीचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. उच्च न्यायालयाचे आदेश आणि कुरुंदकर यांना अटक न केल्याने प्रसार माध्यमातून झालेली टीका यानंतर अखेर नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी अभय कुरुंदकर यास ठाण्यातून अटक केली. कुरुंदकर यास अटक करण्यात आल्याचा वृत्ताला तपास अधिकारी व पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी दुजोरा दिला.