Sun, Jul 21, 2019 12:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिसांची ज्वेलर्सला मदत!

पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिसांची ज्वेलर्सला मदत!

Published On: Dec 07 2018 1:48AM | Last Updated: Dec 07 2018 12:58AM
डोंबिवली : प्रतिनिधी

डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्स फसवणूक कांडातील फरार आरोपी अजित कोठारी याचा आणखी एक कारनामा चव्हाट्यावर आला आहे. कागदोपत्री पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने चक्क पोलिसांचा वापर सुरू केल्याचे एका प्रकरणात उघड झाले आहे. याच फसवणूक कांडात अडकवण्याची धमकी देऊन एका सोनाराकडे दहा लाखांची लाच मागणारा डोंबिवली पोलीस ठाण्याचा अधिकारी आणि त्याचे दोन साथीदार अशा तिघांना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाखाची लाच घेताना रंगेहात अटक केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अटक केलेला सुनील वाघ (34) हा सहायक पोलीस निरीक्षक आहे. तर महेश पाटील (36) आणि प्रकाश दर्जी (36) अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत. ही कारवाई बुधवारी संध्याकाळी झाली. 

सदर प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर आपण कायदेशीर बाबीत अडकू नये म्हणून कोठारी यास गोल्ड ज्वेलरी मेकिंगचे पेपर, गुमास्ता लायसन आणि गाळ्याचा करारनामा परत हवा होता. तो एका सोनाराकडे असल्याने तो त्याच्याकडून घेण्यासाठी त्याने सपोनि सुनील वाघ याची मदत घेतली. वाघ याने या सोनाराला प्रथमेश ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात अडकवण्याची धमकी देतानाच त्याच्याकडे असलेली कोठारीची कागदपत्रे परत करण्यासाठी दबावतंत्र सुरू केले. त्यासाठी त्याने साथीदार महेश पाटील याच्यामार्फत सोनाराकडे 10 लाखांची मागणीही केली. त्यामुळे भयभीत झालेल्या सोनाराने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतीबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. 

तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सापळा लावला. यावेळी सपोनि सुनील वाघ याच्यावतीने प्रकाश दर्जी आणि महेश पाटील या दोघांना लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयांची रोकड घेताना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

अजित गेल्या तीन महिन्यांपासून आपले दुकान बंद करून पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याने बदलापूर, वांगणी आणि डोंबिवली येथील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याचा तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे दुबईला कोणाकडे गुंतवणूक केली याचा शोध सुरू आहे. जनतेचे पैसे परत मिळावे म्हणून पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रथमेश ज्वेलर्स व मालक यांच्यावर डोंबिवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सपोनि वाघ यांच्याकडे सोपवण्यात आला. याचा तपास सुरू असताना एका सोनाराचे नावही पुढे आले. याप्रकरणी सपोनि सुनील वाघ याने या सोनाराची चौकशी सुरु केली.

डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावर गत 15 वर्षांपासून प्रथमेश ज्वेलर्स हे दुकान आहे. त्यांनी सोन्याचे दागिने ठेवी स्वरूपात घेणे सुरू केले. 10 तोळे सोन्याचे दागिने ठेवल्यानंतर त्यावर 1 वर्षानंतर 12 तोळे सोन्याचे दागिने परत करू असे अजित कोठारी याने आमिष दाखवले. त्याला भुलून असंख्य नागरिकांनी सोन्याचे दागिने ज्वेलर्समध्ये गुंतवले. दिवाळी जवळ आल्याने त्यापैकी काही नागरिकांना दागिने परत हवे होते. म्हणून ते ज्वेलर्स दुकानात गेले असता सदर ज्वेलर्सचा मालक अजित कोठारी आपले दागिने घेऊन पसार झाल्याचे आढळल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले.