Thu, Mar 21, 2019 11:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वर्तकनगरची ३३० पोलीस कुटुंबे स्थलांतरित

वर्तकनगरची ३३० पोलीस कुटुंबे स्थलांतरित

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 1:24AMठाणे : खास प्रतिनिधी

मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीमधील चार आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याजवळील तीन अशा सात धोकादायक इमारतींमधील 330 कुटुंबीयांना आज स्थलांतरित करण्यात आले. ही सर्व पोलिसांची कुटुंबे असून त्यांचे पुनर्वसन भाईंदरपाडा येथील लोढा स्प्लेंडोरा गृहसंकुलात करण्यात आले आहे. 

वर्तकनगर पोलीस वसाहतीमधील 58, 59, 60 आणि 61 या सी 1 या संवर्गातील 4 इमारती तसेच वर्तकनगर पोलीस स्टेशन येथील सी 2 ए या संवर्गातील 3 अशा एकूण 7 इमारती आहेत. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व अधिकार्‍यांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. त्याचवेळी पोलीस उपायुक्तांशी चर्चा करून अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणार्‍या पोलिसांच्या कुटुंबीयांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महापालिकेने भाईंदरपाड्यातील लोढा गृहसंकुलातील तब्बल 330 घरांच्या चाव्या पोलिसांच्या स्वाधीन केल्या.

त्यानंतर पोलिसांनी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदर कुटुंबांना स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेतर्फे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री पुरविण्यात येत आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यापूर्वीच सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांची सुट्टी रद्द करण्याचे आदेश दिले असून सर्वांनी प्रभाग स्तरावर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभागात फिरून परिस्थितीची पाहणी करून वेळोवेळी त्याची माहिती आपत्कालीन कक्षास देण्यात यावी. तसेच सी 1 या संवर्गातील शिल्लक राहिलेल्या सर्व इमारती तोडून टाकण्याच्या सूचना दिल्या.