होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहा मिनिटे उशीर; पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

दहा मिनिटे उशीर; पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 12 2018 1:53AM

बुकमार्क करा
विरार : वार्ताहर

केवळ 10 मिनिटांचा उशीर झाल्याने वरिष्ठांनी सर्वांसमोर अपमान करून दिवसभर गैरहजेरी लावणार असल्याची तंबी दिल्याने निराश झालेल्या पोलीस कर्मचार्‍याने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी रात्री वसईत घडली. महेश गोसावी, असे त्यांचे नाव असून त्यांच्यावर गोल्डन पार्क रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

वसई पूर्वेतील अनैतिक मानवी वाहतूक शाखेत महेश गोसावी कार्यरत आहेत. त्यांचे शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्यासोबत कामावरून मतभेद झाले. हे प्रकरण पालघर पोलीस अधीक्षकांपर्यंत गेले, मात्र त्यांनीही योग्य न्यायनिवाडा केला नसल्याचा आरोप गोसावी यांच्या पत्नीने केला आहे. गोसावी यांना रक्तदाबाचा त्रास असतानाही त्यांना पालघर, वसई, ठाणे असे फिरतीचे काम देण्यात आले. वरिष्ठ त्यांचा चार चौघांसमोर अपमान करतात. बुधवारी कामावर जात असताना ते वाहतूक कोंडीत फसले. त्यांनी याबाबत वरिष्ठांना कल्पनाही दिली. मात्र, तरीही वरिष्ठांनी काही ऐकून न घेता त्यांची चांगलीच खरडपट्टी काढून गैरहजेरी लावण्याची सूचना केली.

वारंवार गैरवागणूक मिळत असल्याने नाराज झालेल्या गोसावी संध्याकाळी घरी परतले. त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गोसावी घरी परतल्यानंतर काही वेळाने पुन्हा बाहेर गेले. ते बाहेरून घरी परतले तेव्हा त्यांना मी जेवायला बसायला सांगितले असता त्यांनी नकार दिला आणि झोपायला जातो, असे सांगितले. तेवढ्यात आमचे कौटुंबिक मित्र भूषण चाफेकर यांचा फोन आला. त्यांनी महेश यांनी झोपेच्या 50 गोळ्या घेतल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना लगेच वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली. गोसावी यांचा भाचा दिनेश गोसावी यांनीही पालघरचे पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे व अनैतिक मानवी वाहतूक

शाखेचे प्रभारी पोलीस अधिकारी मारूती पाटील यांच्या त्रासाला कंटाळूनच महेश गोसावी यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप करून मुख्यमंत्र्यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
सध्या गोसावी यांच्यावर गोल्डन पार्क रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत सध्या बरी वाटत असली, तरी आम्ही त्यांना 24 तास निगराणीखाली ठेवणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

दरम्यान, पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाने याप्रकरणी प्रेसनोट जारी केली आहे. त्यात त्यांनी गोसावी यांच्यावर पोलीस खात्यात सुरू असलेल्या चौकशा व त्यांची झालेली बदली ही बाब प्रतिष्ठेची मानून ती रद्द होण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव टाकण्यासाठी तसेच चौकशी व बदली रद्द होण्यासाठी सहानुभूती मिळण्याच्या हेतूने हा प्रकार केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी गोसावी यांच्या विरोधात कलम 309 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.