Mon, May 20, 2019 22:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत ११ फेरीवाल्यांना  पोलिस कोठडी

डोंबिवलीत ११ फेरीवाल्यांना  पोलिस कोठडी

Published On: Aug 30 2018 8:23PM | Last Updated: Aug 30 2018 8:23PMडोंबिवली : वार्ताहर

डोंबिवली स्टेशन परिसरातून हटविलेल्या फेरीवाल्यांनी रहदारीच्या फडके रोडच्या दुतर्फा आपले बस्तान मांडले. स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केला असता फेरीवाल्यांनी व्यापाऱ्यांना शिवीगाळ आणि दादागिरी सुरु केली. ही माहिती कळताच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालिका आणि पोलिसांच्या मदतीने त्या फेरीवाल्यांना तेथून हुसकावून लावले. मात्र, यावेळी फेरीवाल्यांनी केडीएमसीच्या फेरीवाला पथकाला देखील शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकाच्या गाडीचे नुकसान केले. याप्रकरणी डोंबिवली पोलिसांनी ११ फेरीवाल्यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. 

केडीएमसीच्या फेरीवाला हटाव पथकाने गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली स्टेशन परिसरात 150 मीटर अंतराच्या आत बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईची झोड घेतली आहे. बुधवारी सकाळी स्टेशन परिसरातून हुसकावून लावलेल्या फेरीवाल्यांनी थेट फडके रोडवर जाऊन बस्तान मांडले. फडके रोड हा रहदारीचा रस्ता असून त्याच्या दुतर्फा या फेरीवाल्यांनी आपला कब्जा केला. आजपर्यंत कधीही न बसणाऱ्या या रस्त्यावर फेरीवाले बसू लागल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी त्यांना प्रतिबंध केला. व्यापारी विरोध करू लागल्याने संघटीत फेरीवाल्यांनी व्यापाऱ्यांना शिवीगाळ आणि दादागिरी सुरू केली. तुम सौ होंगे तो हम पाचसो है, हमारी कम्प्लेंट करते हो क्या ? एक दिन क्या सालोसाल यहासे नही हटेंगे, अशा धमक्या फेरीवाले देऊ लागले. याची माहिती त्याच रस्त्याने जाणाऱ्या राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांना मिळाली. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांना गाठून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली. वस्तुस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गेलेल्या राज्यमंत्र्यांना देखील मुंब्रा परिसरातून येऊन डोंबिवलीकर कब्जा करू पाहणाऱ्या  फेरीवाल्यांनी अरेरावीची भाषा केली. त्यामुळे राज्यमंत्री चव्हाण यांनी रूद्रावतार धारण केला. त्यांनी पालिकेचे फेरीवाला हटाव पथक आणि पोलिस बंदोबस्त मागवून त्या फेरीवाल्यांना तेथून हटविण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी फेरीवाल्यांच्या नेत्यांनी तुम्ही इथेच बसा, ही जागा काय कुणाच्या बापाची आहे का ? बघू कोण कारवाई करतोय ? अशी फेरीवाल्यांना चिथावणीखोर भाषा केली. याच दरम्यान फेरीवाल्यांचे सामान उचलून जप्त करणाऱ्या पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकाला देखील शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली. एवढेच नव्हे तर पालिकेच्या गाडीची काच फोडून नुकसान करण्यात आले. त्यामुळे फडके रोडवर काही काळ तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. अखेर डोंबिवली पोलिसांनी हस्तक्षेप करून सरकारी कामात अडथळा करणाऱ्या व सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या ११ फेरीवाल्यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.