Fri, Nov 24, 2017 20:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसांच्या तत्परतेने टळली कुटुंंबाची ताटातूट

पोलिसांच्या तत्परतेने टळली कुटुंंबाची ताटातूट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

सांगलीतील घटनेमुळे पोलिसांबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण झाले असतानाच या नकारात्मकतेला छेद देणारी घटना कल्याणमध्ये घडली. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका कुटुंबाची ताटातूट टळल्याचा सुखद प्रकार समोर आला आहे. आई-वडील ओरडल्याने घर सोडून निघून गेलेल्या एका 16 वर्षीय मुलीला सहीसलामत पुन्हा या कुटुंबाकडे देण्यात पोलिसांना यश आले आहे.

पुण्याच्या वाकड परिसरात राहणार्‍या 16 वर्षीय निधी मोरे हिने (नाव बदलले आहे) आई-वडील ओरडले म्हणून 11 नोव्हेंबरला घर सोडले. निधी घरी न आल्याने पालकांनी वाकड पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार दिली. पोलिसांनी प्रयत्न करूनही 2 दिवस तिचा थांगपत्ता लागला नाही. त्यातच 12 तारखेला रात्री एका अनोळखी मोबाईलवरून निधीने आपल्या आईला फोन करुन, मी तुमच्यापासून लांब जात असल्याचे सांगितले. 

बोलता बोलता निधीने आपण आता साईनगर शिर्डी एक्स्प्रेसमध्ये असल्याचे सांगितले. निधीच्या वडिलांनी ही माहिती कल्याणातील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी विलास कुटे यांना कळविली. कुटे यांनी साईनगर-शिर्डी एक्स्प्रेस कल्याण स्टेशनला किती वाजता येते याबाबत माहिती मिळविली. रात्री पावणे बाराच्या सुमारास ही गाडी कल्याणात आली असता विलास कुटे यांनी आपल्या पथकाच्या मार्फत निधीचा शोध घेण्यास सुरुवात केली. 

खबरदारीचा उपाय म्हणून एक पथक रेल्वे प्लॅटफॉर्मवरही पाळतीवर ठेवण्यात आले. अखेर इंजिनाजवळील डब्यामध्ये निधी आढळून आली. निधीला त्यांनी आपल्याबरोबर घेतले आणि तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले.