Thu, Apr 25, 2019 04:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पळवलेले बाळ बारा तासांनी आईच्या कुशीत

पळवलेले बाळ बारा तासांनी आईच्या कुशीत

Published On: Jan 16 2018 2:13AM | Last Updated: Jan 16 2018 2:13AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

ठाणे सिव्हील रुग्णालयातून रविवारी पळविण्यात आलेल्या नवजात बालकाचा अवघ्या 12 तासांत शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. बाळ चोरणार्‍या महिलेला तिच्या चार सहकार्‍यांसह कल्याणमधील पिसावली गावातून अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक अल्पवयीन आहे. या टोळीकडे पळवून आणलेली आणखी पाच बालके सापडली आहेत. या बालकांची डीएनए चाचणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सहआयुक्त मधुकर पांडे यांनी स्पष्ट केले. 

बाळ चोरीप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट 1 कडे सोपवण्यात आला होता. पोलिसांनी ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या सीसीटीव्हीपासून ते महिला रिक्षात बसून ठाणे स्थानकावर सीएसटी लोकलमध्ये बसेपर्यंत ठाणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीचा शोध घेतला. सीसीटीव्हीत महिला लोकलने सीएसटी स्थानकावर गेल्याचे दिसून आले. सीएसटीला उतरल्यानंतर ती डोंबिवली लोकल पकडून डोंबिवलीला गेली. 

ही महिला डोंबिवलीत उतरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी डोंबिवलीत खबर्‍यांचे जाळे अलर्ट केले. खबर्‍यांच्या माहितीनुसार पोलीस पथक  नेताजीनगर, आडवली, पिसावली गाव कल्याण पूर्व येथे पोहोचले. एका घराची झडती घेतली असता चोरलेले बाळ वर्तमानपत्राखाली झाकून ठेवलेले आढळले. त्यानंतर पोलिसांनी गुडिया सोनू राजभर (35) हिला अटक केली. ही महिला पिसावली गावात भाड्याने राहात होती. 

पोलीस पथकाने तिच्या चौकशीत तिचे साथीदार सोनू परशुराम राजभर (40), विजय कैलास श्रीवास्तव (55) यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेल्या सहा तासांच्या नवजात बालकासह 2 महिन्याचे एक, 3 वर्षांचे, 5 वर्षांचे, 9 वर्षांचे एक अशा पाच बालकांची सुटका करीत त्यांना ताब्यात घेतले.