Tue, Jul 16, 2019 01:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोमिलला तीन वर्षे पोलिसांकडूनच अभय

कोमिलला तीन वर्षे पोलिसांकडूनच अभय

Published On: Dec 26 2017 8:16AM | Last Updated: Dec 26 2017 8:16AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

ठाणे पोलिसांना 2 हजार कोटीच्या इफेड्रींनची टीप देणारा खबरी कोमिल अन्वर अली मर्चंट हा गेल्या तीन वर्षांपासून ठाणे, मुंब्रा, कळवा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी आपला ठावठिकाणा बदलून अमली पदार्थाची तस्करी करत होता. तशी माहिती अमली विरोधी पथकानेच कोमिलच्या रिमांड रिपोर्टमध्ये दिली आहे. तब्बल तीन वर्षे अमली पदार्थाची तस्करी करणार्‍या ड्रग्स माफियावर एकदाही कारवाई करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांचा खबरी असल्यानेच पोलिसांनी कोमिलवर एकदाही कारवाई केली नाही, असा आरोप मुंब्रा येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. 

कोमिल अन्वर अली मर्चंट या अमली पदार्थ तस्करास मागील आठवड्यात अमली पदार्थविरोधी पथकाने गोव्यातून अटक केली आहे. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली.

यावेळी पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये कोमिल हा गेल्या तीन वर्षांपासून ठाणे, मुंब्रा, कळवा आणि नवी मुंबई परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत अमली पदार्थाची तस्करी करत होता, असे म्हटले आहे. कोमिलने कुर्ला येथील कुख्यात ड्रग्ज माफिया जावेद अन्सारी सोबत भागीदारीत बांधकाम व्यवसायही सुरु केला होता व दोघे अमली पदार्थ तस्करीतून कमवलेला पैसा त्यात गुंतवत होते, असाही उल्लेख पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये केला आहे. कोमिल व जावेदने के.व्ही. कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी स्थापन केली आहे. कोमिल आपल्या पत्नीच्या नावाने बँकेत खाते उघडून त्याद्वारे आर्थिक उलाढाल करायचा अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

दरम्यान, पोलिसांचा खबरी असल्यानेच कोमिलवर कारवाई करण्यात येत नव्हती, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. 

पोलीस व खबर्‍याचे बिनसले कुठे?

कोमिल विरुद्ध अनेक तक्रारी पोलीस मुख्यालयात करण्यात येवूनही त्याच्याविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई तीन वर्षात झाली नाही. असे असतांना आताच ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्याभोवती कायद्याचा फास का आवळला याबाबतचे रहस्य कायम आहे. अमली पदार्थ तस्करीच्या व्यवसायात असूनही अंगावर दीड ते दोन किलो सोन्याचे दागिने घालून अगदी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या केबिनमध्ये विनापरवानगी सर्रास प्रवेश मिळणारा हा गुन्हेगार अचानक पोलिसांच्या रडारवर आल्याच्या मागे मोठे आर्थिक देवाणघेवाणीचे कारण असल्याचेही बोलले जात आहे.