Wed, Mar 20, 2019 08:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डीसीपींनी मॅनेजर समजून पोलिस निरिक्षकांना मारलं

डीसीपींनी मॅनेजर समजून पोलिस निरिक्षकांना मारलं

Published On: Feb 24 2018 1:36AM | Last Updated: Feb 24 2018 12:10PMमुंबई : प्रतिनिधी

डान्सबारचा परवाना नसताना बारवर कारवाई करताना गुन्हे शाखेच्या एका पोलीस निरीक्षकाला पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी कानशिलात लगावल्याचे वृत्त आहे. दोन दिवसांपूर्वी मालाड येथील अरुणा बारमध्ये घडलेल्या या वृत्ताला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी दुजोरा दिला तर वरिष्ठांनी हे वृत्त फेटाळले आहे.

मालाड येथील एस. व्ही रोडवर अरुणा बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट आहे. या बारमध्ये डान्स परवाना नसताना तिथे काही तरुणींना अश्‍लील गाण्यांवर नृत्य करुन ग्राहकांशी अश्‍लील कृत्य करण्यास प्रवृत्त केले जात होते. गुन्हे शाखेच्या युनिट अकराच्या अधिकार्‍यांनी तिथे रात्री उशिरा कारवाई केली होती. कारवाईचा पंचनामा एक पोलीस निरीक्षक करीत होते. याच दरम्यान तिथे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने आले. त्यांनी पंचनामा करणार्‍या पोलीस निरीक्षकाच्या कानशिलात लगावली. 

हा संपूर्ण प्रकार तिथे उपस्थित अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या समोर घडला होता. विक्रम देशमाने यांना आपली चूक समजून आल्यानंतर त्यांनी तो पोलीस अधिकारी मॅनेजर समजून कानशिलात लगावल्याचे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते तेथून निघून गेले. बारचा मॅनेजर पंचनामा करीत नाही, पोलीसच कारवाईनंतर पंचनामा करतात हे माहीत असतानाही एका पोलीस उपायुक्ताने इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या समोरच पोलीस निरीक्षकाला कानशिलात लगावल्याने पोलीस दलात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. हा प्रकार उघडकीस येताच वरिष्ठांनी अशी कोणतीही घटना घडली नाही असे सांगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु केला. 

पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी अशी कुठलीही घटना झाली नाही. ही अफवा असल्याचे सांगितले. पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले.

या वृत्ताचा सहपोलीस आयुक्तांनी इन्कार केला आहे. काहीजण वैयक्तिक फायद्यासाठी अशा वृत्ताचा आधार घेत आहेत. बार आणि खबर्‍यांची नेटवर्क आहे. त्यातून ही बातमी पसरवण्यात आली आहे. अशा प्रकारे अफवा पसरविणार्‍याविरुद्ध कारवाई करण्याची तयारी सुरु असल्याचेही पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी सांगितले.