Wed, Apr 24, 2019 20:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्य पोलीस दलाचे पगार लांबले

राज्य पोलीस दलाचे पगार लांबले

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 12:55AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील

दर महिन्याच्या दोन तारखेला होणारा पगार राज्य पोलीस दलातील सुमारे दोन लाखांहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना 12 एप्रिल उजाडल्यानंतरही झालेले नाहीत. यामुळे कर्मचार्‍यांचे महिन्याचे बजेट कोलमडले असून कर्ज घेतलेल्या कर्मचार्‍यांना बँकांनी व्याज आकारणी करण्यास सुरुवात केली आहे. सर्व पोलिसांचे वेतन हे अ‍ॅक्सिस बँकेमार्फत केले जाते. मात्र मार्च एण्डचा चांगलाचा फटका पोलिसांच्या वेतनाला बसला आहे. 20 एप्रिलपर्यंत पगार होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. 

राज्यात दहा पोलीस आयुक्तालये असून 36 एसपी कार्यालये आणि 9 स्पेशल आयजी कार्यालये, 14 पोलीस प्रशिक्षण केंद्रे, 1051 पोलीस ठाणी, 16 राज्य राखीव दलाच्या कंपन्या आणि 627 पर्यवेक्षक कार्यालयांसह मुंबई पोलीस दलाचा स्वतंत्र कारभार आहे. या राज्य पोलीस दलातील सर्वच आयपीएस अधिकार्‍यांसह पोलीस शिपाईपर्यंतच्या एकाही कर्मचार्‍याचा मार्च महिन्याचा पगार झाला नाही. मार्चअखेर असल्याने पगार उशिरा होत असल्याचे सर्वच पोलीस आयुक्तालयातून सांगण्यात येत आहे. मात्र यामुळे राज्यातील सुमारे 88 हजार 650 कर्मचार्‍यांनी पोलीस पतपेढी, राष्ट्रीयकृत बँकांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने त्यावर व्याज आकारणी केल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले.

दर महिन्यांला पाच तारखेला होणारे पगार मार्च महिना संपवून 13 एप्रिल उजाडल्यानंतरही झालेला नाही. प्रत्येक पोलीस ठाणे, एसीपी, डीसीपी, सीपी ऑफीसमधील क्‍लार्कने पगारबिले 31 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान बनवून पाठून दिले होते. मार्च महिन्यांचे शेवटचे तीन दिवस बँक बंद होत्या. तर अखेरच्या शनिवारी बँक एक दिवसासाठी सुरू होती. त्यावेळेत बँकांनी आपली कामे पूर्ण केली. पण त्याचा परिणाम पोलिसांच्या पगारावर झाला आहे. राज्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. 20 एप्रिलपर्यंत पगार होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. 

Tags : Mumbai, Police Force Salary issue, Mumbai news,