Mon, Aug 19, 2019 13:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेंच्युरी रेयॉनमध्ये विषारी गॅसगळती

सेंच्युरी रेयॉनमध्ये विषारी गॅसगळती

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 2:03AMउल्हासनगर : वार्ताहर 

उल्हासनगर शहरातील शहाड परिसरात असणार्‍या सेंच्युरी रेयॉन कंपनीत विषारी गॅसची गळती होऊन एका हंगामी कामगाराचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या दुर्घटनेत इतर 11 कामगारांनाही गॅसची बाधा झाली असून, त्यांच्यावर कल्याणच्या फोर्टिज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय रामबरन शर्मा (34) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे कंपनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत गॅसगळतीवर नियंत्रण मिळवल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

मृत संजय हे कॅम्प नं. 1 येथील कोकाटे चाळीमध्ये राहत होते. या घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने संजयच्या कुटुंबाला 5 लाखांची आर्थिक मदत, वारसाला कंपनीमध्ये नोकरी, मुलांसाठी कंपनीच्या अनुदानित शाळेत मोफत दहावीपर्यंतचे शिक्षण आणि कंपनी वसाहतीमध्ये राहण्याची सोय केली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी अनिल व्यास यांनी दिली. उल्हासनगर कॅम्प नं. 1 मधील सेंच्युरी रेयॉन कंपनीतील स्पिनबाथ विभागात डक्ट रिप्लेसमेंटचे काम गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू होते. हे काम ज्युपिटर तसेच रामजी या दोन कंत्राटदारांना देण्यात आले होते.

ज्युपिटर आणि रामजी या दोघांकडील प्रत्येकी सहा-सहा हंगामी कामगार डक्ट रिप्लेसमेंटचे काम करीत होते. या डक्टमधून हायड्रोजन सल्फाईट व कार्बन डायसल्फाईड हा विषारी गॅस बाहेर निघतो. रात्री 9 च्या सुमारास या विभागात काम सुरू असताना अचानक पाईपमधून गॅस गळती होऊ लागल्याने संजयला गॅसची बाधा झाली. यात तो गुदमरून जागीच कोसळला. याचवेळी इतर कामगारांनी संजयकडे धाव घेतली असता त्यांनाही गॅसची बाधा झाली. 

दरम्यान, या कामगारांना तातडीने सेंच्युरी कंपनीच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर या सर्वांना कल्याण येथील फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात संजयला मोठ्या प्रमाणात गॅसची बाधा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर अन्य कामगारांवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती उल्हासनगर पोलीस व अग्निशमन दल यांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने गॅसगळतीवर नियंत्रण आणल्यावर सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. या घटनेप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पो. उप. नि. म्हस्के करीत आहेत.