Sun, May 26, 2019 19:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कविवर्य मधुकर जोशी 88व्या वर्षी घराच्या शोधात

कविवर्य मधुकर जोशी 88व्या वर्षी घराच्या शोधात

Published On: Jul 11 2018 1:37AM | Last Updated: Jul 11 2018 12:55AMडोंबिवली : बजरंग वाळूंज

अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, हे अजरामर गीत लिहिणारे ज्येष्ठ कवी मधुकर जोशी हे वयाच्या 88 व्या वर्षी घराच्या शोधात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. डोंबिवलीत राहत असलेल्या कविवर्य जोशी यांची 40 वर्षांची इमारत धोकादायक झाली आहे. बिल्डरने रहिवाशांना ही जागा रिकामी करण्याची नोटीस दिली असून आता या वयात जायचे कुठे? असा प्रश्न कविवर्य जोशी यांना पडला आहे.

आयरे येथील हेरंब या चार मजली इमारतीत कवी मधुकर जोशी हे राहतात. या इमारतीत 43 भाडेकरू रहात होते. तथापि जागा खाली करण्याची नोटीस दिल्याने 40 जणांनी त्यांची घरे खाली केली. इमारतीत आता अवघी तीन कुटुंबे रहात आहेत. कवी जोशी यांना विचारले असता ते म्हणाले, जागेसाठी खूप पैसे लागतात ते कुठून आणू? डिपॉझिट खूप सांगतात व भाडे माझ्या तुटपुंज्या पैशात मला ते शक्य नाही. 40 वर्ष मी नोकरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, सरकारकडे जागा मागितली नाही का? असे विचारले असता सरकारवर माझा विश्वास नाही. माझ्यापेक्षा ज्येष्ठ-श्रेष्ठ कवी शांता शेळके, कवी कुसुमाग्रज यांची घरेही मोडकी होती, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. कविता लेखनाची आपण तपश्‍चर्या केली असली तरी साहित्यामध्ये त्याला काही किंमत नाही. अनेक ठिकाणच्या संस्था आणि संघटनांनी माझे सत्कार केले. पण ते त्या काळापुरतेच असतात, नंतर त्याला कोण किंमत देत नाही. मराठी भाषेतील कवींना फारशी किंमत नाही. मात्र हिंदी भाषिक परप्रांतीय लेखक, कवींना खूपच मान सन्मान असतो, असेही ते काकुळतीला येऊन म्हणाले.