Fri, May 24, 2019 09:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत, मात्र लेखी द्या : आबा पाटील 

'मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत, मात्र लेखी द्या'

Published On: Aug 06 2018 1:41AM | Last Updated: Aug 06 2018 1:41AMमुंबई : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जी सकारात्मक भूमिका घेतली, तिचे आम्ही स्वागत करतो. मात्र त्यांनी मराठा आरक्षण, मेगाभरतीला स्थगिती आदी मागण्यांबाबत लेखी निवेदन द्यावे, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी दै. पुढारीला दिली. 

मराठा आरक्षणासाठी बीडच्या परळीत गेले 19 दिवस सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाची दखल घेत अखेर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका जाहीर केली. हा राज्यातील मराठा बांधवांचा विजय असून मराठा आरक्षणाच्या मागणीला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो, मात्र जे निवेदन त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून केले ते लेखी स्वरूपात द्यावे, असे आबा पाटील म्हणाले.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील ज्या तरुणांनी आत्मबलिदान दिले, त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, तसेच विविध स्वरूपाच्या आंदोलनांत मराठा समाजातील तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक घेऊन आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.