Mon, May 20, 2019 20:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आजपासून प्लास्टिकच्या कोणत्या वस्तूंवर बंदी?

आजपासून प्लास्टिकच्या कोणत्या वस्तूंवर बंदी?

Published On: Jun 23 2018 1:27AM | Last Updated: Jun 23 2018 8:40AMमुंबई/पुणे : प्रतिनिधी

राज्य सरकारने राज्यात प्लास्टिक, थर्माकोलबंदी लागू करण्यासाठी  काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने पुन्हा एकदा फेटाळून लावली व सुनावणी पुढे ढकलली. याचिकाकर्ते उत्पादक, वितरक व व्यापार्‍यांच्या संघटनेला बाजू मांडण्यासाठी 20 जुलैपर्यंत, तीन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयातील शुक्रवारच्या आढावा बैठकीत शनिवार, दि. 23 जूनपासून राज्यात प्लास्टिक व थर्माकोल बंदी लागू करत असल्याची घोषणा केली. ग्राहकाच्या हातात बंदी असलेली कॅरीबॅग आढळल्यास पाच हजार रु. दंड, तर विक्रेत्याला पहिल्यावेळेस पाच हजार, दुसर्‍यावेळी नियमभंग केल्यास 10 हजार रु. दंड, तर तिसर्‍यावेळी बंदी मोडल्यास 25 हजार रु. दंड ठोठावला जाईल. तसेच विक्रेत्यास तीन महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते.

प्लास्टिक व थर्माकोलबंदी लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील अठरावे राज्य असेल. प्लास्टिक, थर्माकोल बंदीच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून विशेष कृतिदल स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय अतिरिक्‍त मुख्य सचिवांच्या  अध्यक्षतेखाली जाणकारांची समिती आणि अंमलबजावणीसाठी एक विशेष समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान, थर्माकोल असोसिएशनने कदम यांची भेट घेत गणेशोत्सव काळापुरती थर्माकोल वापरण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचा आपल्याला फटका बसू नये, यासाठी पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळांवर प्लास्टिकमिश्रित कापडी पिशव्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. याबाबत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दखल घेत अशा पिशव्या विक्री व खरेदी करणार्‍यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच उत्पादने तयार करणार्‍या कारखाने व गोदामांवर धाडी टाकून गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. राज्यातील विविध शहरांमधून किती प्लास्टिक जमा होते, त्यावर रिसायकलिंग केले जाते का, याबाबतची माहितीही त्यांनी संबंधित अधिकार्‍यांकडून मागवली आहे.

विनापरवाना प्लास्टिक उत्पादन करणार्‍या कारखान्यांविरोधात गुन्हे दाखल करून कारखाने सील करा, तसेच राज्यात ठिकठिकाणी शहरांमध्ये प्लास्टिक उत्पादनाची साठवणूक करणार्‍या गोडावूनचा शोध घेऊन तेथील माल जप्तीच्या सूचना कदम यांनी दिल्या. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील पर्यावरण समितीला प्लास्टिक बंदीसंदर्भात केलेल्या उपाययोजना व जनजागृतीचा आढावाही कदम यांनी मागविला आहे.

प्लास्टिक आणि थर्माकोलपासून बनविण्यात येणार्‍या उत्पादनांवर यंदाच्या गुढीपाडव्यापासून राज्यात सरसकट बंदी घालण्याची घोषणा कदम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनकाळात विधानसभेत केली होती. त्यानंतर सरकारने 23 मार्च रोजी यासंदर्भात अधिसूचना काढली होती. मात्र, त्याविरोधात प्लास्टिक व थर्माकोल उत्पादक, वितरक व व्यापार्‍यांच्या संघटनेने एप्रिलमध्येच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने तेव्हाही बंदीच्या अध्यादेशाला स्थगितीस नकार देत उत्पादक, वितरक, व्यापारी व ग्राहकांना त्यांच्याजवळील शिल्लक प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व थर्मोकोलच्या साठ्याची विल्हेवाट  लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. मात्र, या मुदतीत नव्याने विक्रीला पूर्णपणे बंदी घातली होती. तसेच या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्य सरकारने  कोणावरही कारवाई करू नये, असे स्पष्ट निर्देशही न्यायालयाने दिले होते. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी प्लास्टिक व थर्मोकोल बंदी आवश्यक  असल्याचे न्यायालयाने तेव्हा अधोरेखित केले होते. ही तीन महिन्यांची मुदत गुरुवार, 22 जून रोजी संपुष्टात आली आहे. न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्याने,  अंतिम सुनावणी व निर्णय येईपर्यंत प्लास्टिक व थर्मोकोलबंदीच्या  अंमलबजावणीचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला.

तत्पूर्वी, या याचिकेवर जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने भक्‍कमपणे बाजू मांडली होती. यासंदर्भातील प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारने  स्पष्ट केले होते की, याचिकादार संघटनांनी राज्य सरकारपुढे सादरीकरण केले.  मात्र, ते कोणताही ठोस पर्यायी मार्ग सुचवण्यात अपयशी ठरले. बंदीच्या  अंमलबजावणीसाठी विशेष कृतिदल स्थापन केल्याची तसेच दोन विशेष समित्या  नेमल्याची माहितीही सरकारने न्यायालयात दिली होती.प्लास्टिक बंदीसाठी व्यापार्‍यांना हवीय 2019 पर्यंत मुदतवाढ सरकारकडून प्लास्टिकबंदीची पूर्ण तयारी झाली आहे. 

23 जून पासून लागू होणार्‍या प्लास्टिक बंदी संदर्भात व्यापारी आक्रमक झाले आहेत. या प्लास्टिक बंदीला व्यापार्‍यांनी विरोध केला आहे. 2019 पर्यंत व्यापार्‍यांना वेळ देण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली आहे. सध्या प्लास्टिक बंदी बद्दल सर्वांमध्ये संभ्रम आहे शिवाय प्लास्टिक बंदी ने व्यापार्‍यांचे नुकसान होणार आहे असे देखील व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. सरकारने प्लास्टिक बंदीसाठी व्यापार्‍यांना मुदत वाढून दिली पाहिजे, यासाठी गुरुवारी मुंबई, नवी मुंबई, ठाणे इथल्या व्यापार्‍यांची भाजपचे आमदार राज पुरोहित यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत व्यापार्‍यांनी आपली कैफियत पुरोहित यांच्याकडे मांडली. 

गुजरातवर खास नजर

महाराष्ट्रात 80 टक्के प्लास्टिक गुजरातहून येते 
गुजरातहून प्लास्टिक आणणार्‍यांना तीन महिने तुरुंगवास
प्लास्टिक उत्पादन करणार्‍यांवर करडी नजर
यंदाच्या गणेशोत्सवात थर्माकोल वापरण्यास मुभा मिळण्याबाबतचा प्रस्ताव ठेवणार हायपॉवर कमिटीमध्ये
वेफर्स, बेकरींना दिलासा
ब्रँडेड वेफर्स,बेकरी प्रॉडक्ट यांना तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. मात्र त्यांनाही रिकाम्या पिशव्यांच्या रिसायकलिंगचा प्रस्ताव सादर करावा लागेल. 

5 ते 25 हजार दंड; तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

थर्माकोल तसेच प्लास्टिक पिशव्यांचा (कॅरीबॅग) वापर करणार्‍या दुकानदारांबरोबरच नागरिकांकडूनही महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियम 2006 नुसार,  पहिल्यावेळी नियमभंग केल्यास पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. दुसर्‍यावेळी नियमभंग केल्यास विक्रेत्यास 10 हजार रुपये दंड, तर तिसर्‍यावेळी नियमभंग केल्यास 25 हजार रुपये व गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद बंदी कायद्यात आहे. यात विक्रेत्यास तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

बंदीतून सूट असलेल्या वस्तू, प्रकार

एफडीए रजिस्टर्ड उत्पादनाकडून प्लास्टिकच्या पाकिटात, आवरणात येणारे वेफर्स, चिप्स, चिवडा, बिस्कीट, केक आदी ब्रँडेड खाद्यपदार्थ 
हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारी प्लास्टिक उपकरणे, सलाईन बॉटल्स, औषधांचे आवरण 
प्लस्टिक पेन 
दुधाच्या पिशव्या (50 मायक्रॉनच्या वर) 
रेनकोट 
अन्‍नधान्य साठवण करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लस्टिक 
शेती, रोपवाटिका, ओला कचरा जमा करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या विघटनशील प्लास्टिकच्या पिशव्या उद्योगात, उत्पादन प्रक्रियेतच वापरण्यात येणारे प्लास्टिक आणि थर्माकोल 
ब्रँडेड शर्ट, ड्रेस, साड्या यांची उत्पादकांकडून गुंडाळलेली प्लास्टिक वेष्टणे 
टीव्ही, फ्रीज, कॉम्प्युटर यासारख्या उत्पादनांना पॅकिंग करताना वापरण्यात येणारे थर्माकोल आणि प्लास्टिक 
ब्रँडेड दूध, तेल असलेल्या जाड प्लास्टिक पिशव्या तसेच बाटलीबंद पाणी 
निर्यात होणार्‍या वस्तूंसाठी वापरले जाणारे प्लास्टिक वेष्टण, आवरण, पिशव्या 
मलनिस्सारण हाताळण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक 
धान्य साठवण्यासाठी तसेच इतरत्र वापरल्या जाणार्‍या वोवन पॉलिप्रॉपिलेन पिशव्या.

बंदी असलेल्या वस्तू, प्रकार

सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (यात मायक्रॉन, साईज, पातळ-जाड, बंध असलेल्या-नसलेल्या अशी कोणतीही सूट नाही)
हॉटेलमध्ये पार्सलसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक डबे, चमचे, स्ट्रॉ तसेच नॉनवोवन पॉलिप्रॉपिलेन पिशव्या 
थर्माकोल व प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेले कप, ग्लास तसेच ताट, वाट्या, ग्लास, चमचे इ. एकदाच वापरून फेकल्या जाणार्‍या (यूज अँड थ्रो) 
फरसाण, नमकीन व इतर नॉन ब्रँडेड खाद्यपदार्थांची प्लास्टिक पाकिटे, आवरणे (यात ब्रँडेड, एफडीए 
रजिस्टर्ड उत्पादक कंपन्या पॅकिंगसाठी वापरतात त्या प्लास्टिकची पाकिटे, आवरणांचा समावेश नाही) 
नारळपाणी, चहा, सूप इ. पातळ पदार्थ देण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पिशव्या.
कोणतेही उत्पादन ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे रॉ प्लास्टिक आवरण.