Sun, Aug 18, 2019 21:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिक दंडकपातीमध्ये शिवसेनेचा खो

प्लास्टिक दंडकपातीमध्ये शिवसेनेचा खो

Published On: Jun 21 2018 1:35AM | Last Updated: Jun 21 2018 12:59AMमुंबई : प्रतिनिधी 

प्लास्टिक बाळगणार्‍या दुकानदारांवर शनिवारपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पालिका प्रशासनाने चार टप्प्यांत वर्गवारी करून, दंडाची रक्कम कमी करण्याचा प्रस्ताव विधी समितीत सादर केला होता. पण पर्यावरण मंत्र्यांच्या भीतीपोटी शिवसेनेने विधी समितीत सादर केलेला प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे दुकानदारांना आता 5 ते 10 हजार रुपये दंड भरणे भाग पडणार आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात शनिवार 23 जूनपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण दंडाची रक्कम 5 ते 10 हजार रुपये असल्यामुळे यात तडजोड करण्यासाठी पालिकेने दंडाची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार व्यवसायाचे चार टप्पे तयार करण्यात आले आहेत. यात फेरीवाला, किराणा माल, फळरस व चहाकॉफी विक्रेते व हॉटेल, मॉल आदींचा समावेश आहे. दंडासंदर्भात विधी समिती अध्यक्षा सुवर्णा करंजे यांना विचारले असता, पालिकेला दंड कमी करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले.

पण नियमानुसार विधी समिती, स्थायी समिती व महापालिका सभागृहाच्या मंजुरीशिवाय दंड कमी करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पालिका पाठवूच शकत नाही, याकडे करंजे यांचे लक्ष वेधले. यावर त्यांनी पक्षादेश असल्यामुळे निर्णय घेतल्याचे सांगितले. तर याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना विचारले असता, प्लास्टिक पिशवी बाळगणार्‍या दुकानदारांना भीती राहावी, यासाठी दंडाची रक्कम कमी करण्यास शिवसेनेचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दुकानदारांना 2012 च्या नियमांनुसार पहिल्या गुन्ह्यासाठी 5 हजार रुपये तर दुसर्‍या गुन्ह्यासाठी 10 हजार  दंड भरावा लागणार आहे.