Mon, Mar 25, 2019 17:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रस्त्यांच्या कामात प्लास्टिकची सक्ती

रस्त्यांच्या कामात प्लास्टिकची सक्ती

Published On: Jun 22 2018 2:42AM | Last Updated: Jun 22 2018 1:52AMमुंबई : दिलीप सपाटे 

राज्यातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व निरोपयोगी प्लास्टिकचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी मोठे पाऊल उचलले. यापुढे राज्यातील रस्त्यांच्या कामामध्ये प्लास्टिकचा वापर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. विशेष राज्य मार्ग, राज्य मार्गांच्या कामात व रस्त्यांच्या नूतनीकरणात प्लास्टिक वापरून डांबरीकरणाची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी कंत्राटाच्या अंदाजपत्रकामध्येच प्लास्टिकचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे टाकावू प्लास्टिकही आता उपयुक्त ठरणार आहे. 

राज्य सरकारने प्लास्टिकबंदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्यात निर्माण होणार्‍या प्लास्टिक कचर्‍याचे करायचे काय, हा प्रश्‍न शिल्लक आहे. विशेषत: शहरांमध्ये दररोज शेकडो टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. प्लास्टिक कचरा हा पर्यावरणासाठीही घातक बनला आहे. त्यावर उपाय म्हणून निरुपयोगी प्लास्टिकचा वापर रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामात केला जाणार असून हा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यासबंधी आदेश जारी केला आहे. 

डांबरीकरणाच्या कामात काही प्रमाणात निरुपयोगी प्लास्टीकचा वापर केल्यास रस्त्यांची कामे कमी किंमतीत व गुणवत्तापूर्ण होत असल्याचा अहवाल केंद्र सरकारच्या सीएसआयआर या संस्थेने दिला आहे. त्यानुसार केंद्र सरकारने नगरपालिका क्षेत्राच्या जवळपास रस्त्यांची कामे करताना प्लास्टीकचा वापर सुुरु केला आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही आता प्लास्टीकचा वापर करण्यावर शिक्कामोर्तब सुरु केले आहे. 

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक तीन महिन्यांनी कामाच्या दर्जाबाबत तपासणी करण्यात येणार असून एक वर्षाच्या कालावधीनंतर राज्य सरकारला अहवाल सादर करावा लागणार आहे.