Wed, Jul 24, 2019 12:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शनिवारपासून प्लास्टिकबंदी होणारच!

शनिवारपासून प्लास्टिकबंदी होणारच!

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 19 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी

पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी राज्यात प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. या बंदी आदेशाची अंमलबजावणी 23 जूनपासून सर्वत्र सुरू करण्यात येईल. बंदी आदेश मोडल्यास तीन महिन्यांचा कारावास आणि 5 ते 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. दंडाची ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत कमी केली जाणार नाही, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

राज्यात प्लास्टिक बंदी करण्याच्या दृष्टीने पर्यावरण विभागाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत यासंदर्भातील कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. प्लास्टिक उत्पादकांकडील साठा संपविण्यासाठी देण्यात आलेली तीन महिन्यांची मुदत 22 जून रोजी संपत आहे. न्यायालयात देखील याच दिवशी सुनावणी होणार असून प्लास्टिक बंदीबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी आशा असल्याचे पर्यावण मंत्री कदम यांनी सांगितले.

प्लास्टिक बंदीच्या निर्णयावरून सुरुवातीला राज्यात बराच गदारोळ झाला. सरकारच्या या निर्णयाविरोधात काही जण न्यायालयातही गेले आहेत. मात्र राज्यातील जनतेने हा निर्णय उचलून धरला असून लोक स्वत:हून प्लास्टिक बंदीसाठी आग्रह धरू लागले आहेत. उद्योजक सुद्धा प्लास्टिकच्या पुर्नवापरासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. कायद्याने प्लास्टिक बंदीस सुरुवात झाल्यावर महिन्याभरात त्याचे परिणाम सर्वत्र दिसू लागतील, असे ते म्हणाले.

दूध, पाण्याच्या बाटल्यांची पुनर्खरेदी

दुधाच्या पिशव्या व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्यात याबा. त्यासाठी  पुर्न खरेदीची अट घालण्यात आली आहे. ग्राहकाने पिशवी परत केल्यानंतर त्यांना पिशवीमागे 50 पैसे तर बाटली परत केल्यानंतर बाटलीमागे 1 रूपया परत मिळणार आहे. दूध डेअरी, वितरक व दूध विक्रेत्यांंवर ग्राहकांकडून खरेदी करणे बंधनकारक आहे.