Mon, Mar 25, 2019 18:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात उद्यापासून प्लास्टिक बंदी

राज्यात उद्यापासून प्लास्टिक बंदी

Published On: Mar 17 2018 1:32AM | Last Updated: Mar 17 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी

प्लास्टिक तसेच थर्माकॉलपासून बनविण्यात येणार्‍या उत्पादनांवर  राज्यात बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत केली. त्याचे उल्लंघन करणार्‍यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास व जास्तीत जास्त 25 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. उत्पादक, विक्रेते व या पिशव्यांचा वापर करणार्‍यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी या प्रस्तावास मान्यता दिली.  येत्या रविवारपासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून ही बंदी अंमलात येणार आहे.

पुनर्वापर यंत्रणा करणे बंधनकारक

राज्यात फूड क्‍वालिटी दर्जाप्राप्त बिसफेनाल-अ विरहीत पीईटी व पीईटीईपासून बनविलेल्या व पुनर्वापरासाठी  निश्‍चित  करण्यात आलेल्या बाटल्यांचा वापर खरेदी, विक्री, साठवणुकीसाठी  काही अटी निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार उत्पादक, विक्रेते व वितरकांनी पर्यावरणासंबंधी जबाबदारी म्हणून अशा बाटल्यांच्या पुनर्वापरासाठी त्याची खरेदीची  व्यवस्था निर्माण करून, पुरेशी क्षमता असलेले संकलन व पुनर्वापर केंद्र तीन महिन्यांत सुरू करणे बंधनकारक असेल. यातील बाटलीची खरेदी किंमत ही एक रुपयापेक्षा कमी ठेवता येणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. 

पुनर्वापरासाठी मिळणार अनुदान

वस्तू व सेवा कर संचालनालयाकडे या पुनर्वापर  शुल्काद्वारे जमा झालेल्या रकमेतून प्लास्टिकचा पुनर्वापर करणार्‍या उद्योगांना त्यांनी केलेल्या एकूण प्लास्टिक कचर्‍याच्या पुनर्वापराच्या  प्रमाणानुसार परतावा देण्याची तरतूद  सुचविण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने व उद्योग संचालनालयाने नोंदणी केलेल्या असा अधिकृत उद्योगांची यादी वस्तू व सेवा कर संचालनालयास उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. पर्यावरण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली  यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त, नगरपालिका मुख्याधिकार्‍यांसह अन्य अधिकार्‍यांना याबाबतच्या कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.

यावर येणार पूर्णपणे बंदी

प्लास्टिकपासून बनविण्यात येणार्‍या पिशव्या तसेच पॅलिस्टायरिन (थर्माकॉल) व प्लास्टिकपासून बनविण्यात येणार्‍या डिस्पोजबल वस्तू उदा. ताट, कप, प्लेटस्, ग्लास, काटे-चमचे, वाटी, स्ट्रॉ, कटलरी, नॉन ओव्हन पॉलीप्रॉपीलेन बॅग, स्प्रेडशीटस्, प्लास्टिक पाऊच, सर्व प्रकारचे प्लास्टिक वेष्टन यांचा वापर, उत्पादन, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, आयात व वाहतूक करण्यास राज्यात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. रामदास कदम यांनी या निर्णयाची माहिती नंतर पत्रकारांना दिली.

यांना बंदीमधून वगळले

औषधांच्या वेष्टनासाठी वापरले जाणारे प्लास्टिक, वन व फलोत्पादनासाठी, कृषी, घनकचरा हाताळणे आदी कारणांसाठी लागणार्‍या तसेच रोपवाटिकांमध्ये वापरण्यात येणारी प्लास्टिक पिशवी, प्लास्टिक शिटस् यांना बंदीतून वगळण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी वापरण्यात येणार्‍या या साहित्यावर ठळकपणे तसे नमूद करण्याची सक्‍तीही   केली.

या पिशव्यांची पुन्हा खरेदी

विशेष आर्थिक क्षेत्र, निर्यातक्षम  उद्योग यामध्ये फक्‍त निर्यातीसाठी प्लास्टिक व प्लास्टिक पिशवीची उत्पादने बंदीतून वगळण्यात आली आहेत. त्याचबरोबर उत्पादनाच्या ठिकाणी उत्पादन प्रक्रियेदरम्यान अत्यावश्यक वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक आवरण किंवा पिशवी तसेच दुधाच्या पॅकेजिंगसाठी अन्‍न साठवणुकीचा दर्जा असलेल्या 50 मायक्रॉनपेक्षा जाड प्लास्टिक पिशव्याही बंदीमधून वगळल्या आहेत. पुनर्खरेदी पद्धती विकसित करण्यासाठी अशा पिशव्यांवर  त्याच्या पुनर्वापरासाठी 50 पैशांपेक्षा कमी नसेल, अशी किंमत ठळकपणे छापणे  बंधनकारक  करण्यात आले आहे. या पिशव्यांच्या पुनर्वापरासाठी अशा पिशव्यांचे संकलन हे दूध डेअरी, वितरण व विक्रते यांच्याकडे छापील किमतीनुसार पुनर्खरेदी करणेही  बंधनकारक करण्यात आले आहे.

दुधाच्या पिशवीला 50 पैसे, तर रिकाम्या बाटलीसाठी एक रुपया मिळणार

प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली असली तरी काही बाबी वगळण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दुधाच्या पिशव्या व पाण्याच्या बाटलीचा समावेश आहे.  याचा पुनर्वापरासाठी उपयोग केला जाणार आहे. त्यामुळे दुधाच्या रिकाम्या पिशव्या 50 पैसे, तर रिकामी पाण्याची बाटली एक रुपयाला विकता येणार आहे. संबंधित उत्पादकांना त्यासाठीच्या खरेदीची यंत्रणा उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Tags : mumbai, mumbai news, Plastic ban, government, Ramdas Kadam,