Thu, Nov 15, 2018 15:53



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दुकाने, मॉल्सच्या परवान्यांसाठी प्लास्टिकबंदीची अट

दुकाने, मॉल्सच्या परवान्यांसाठी प्लास्टिकबंदीची अट

Published On: Jan 17 2018 2:00AM | Last Updated: Jan 17 2018 1:40AM

बुकमार्क करा




मुंबई : प्रतिनिधी

प्लास्टिकच्या अतिवापराचे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लवकरच प्लास्टिक पिशव्या व वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. हे लक्षात घेता दुकाने, मॉल्स, तसेच विविध आस्थापनांच्या परवान्यांसाठी प्लास्टिक वापर बंदीची अट घालण्यात येणार आहे. संबंधित प्राधिकरण अथवा निरीक्षकांना परवाने नूतनीकरणाच्या वेळी प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळण्याबाबतची अट घालण्याच्या सूचना पर्यावरण विभागाने दिल्या आहेत.

प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकची इतर उत्पादने ही नैसर्गिक व जैविक दृष्ट्या विघटनशील नसल्याने त्याच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. यामुळे प्लास्टिकपासून बनविल्या जाणार्‍या पिशव्या, थर्माकोलच्या प्लेटस, ताट, वाट्या, चमचे, कप, ग्लास, बॅनर्स, तोरण, ध्वज आदी सर्व प्रकारचे प्लास्टिक वेस्टन याचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण आणि विक्री करण्यावर संपूर्ण राज्यात लवकरच बंदी घालण्यात येणार असल्याची अधिसूचना पर्यावरण विभागाने प्रसिद्धीस दिली आहे.

प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकची इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते व त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात गेल्याने त्यांचा मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी प्लास्टिक वापर आणि निर्मितीवर बंदी घालण्यात येत आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे व जनतेत जनजागृती करण्यासंदर्भात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्याचे पर्यावरण विभागाने म्हटले आहे.