Tue, Apr 23, 2019 13:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकबंदी शिथिल होण्याची चिन्हे

प्लास्टिकबंदी शिथिल होण्याची चिन्हे

Published On: Jun 27 2018 2:12AM | Last Updated: Jun 27 2018 2:09AMमुंबई : वृत्तसंस्था

मुंबई महापालिकेने नुकतीच कोठे प्लास्टिक बंदीसंदर्भातील दंडात्मक  कारवाईला सुरुवात केली असताना काही वस्तूंवरील प्लास्टिक वापरासंदर्भातील काही निर्बंध मागे घेण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. राज्यातील अनेक व्यापारी संघटनांनी प्लास्टिकबंदीबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने सरकारने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.   

स्थानिक किराणा दुकानदारांकडून किरकोळ स्वरुपातील वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी उदा. तांदूळ, साखर किंवा डाळी यासारख्या वस्तूंसाठी वापरण्यात येणार्‍या प्लास्टिक पिशव्यांवरील निर्बंध मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी संबंधित उत्पादकांनी सदर पिशव्या गोळा करुन त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा उभारण्याची अट घातली जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ समितीने काही अंशी प्लास्टिकबंदी मागे घेण्यासंदर्भात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या नेतृत्वाखालील अधिकार समितीकडे शिफारस केली आहे. पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणार्‍या प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठीची यंत्रणा उभारण्याबाबतचा प्रस्ताव घेऊन कोणी पुढे आल्यास अधिकार समिती पॅकेजिंगसाठीच्या प्लास्टिकवरील निर्बंध मागे घेईल. प्लास्टिक     बंदीमुळे निर्माण होणार्‍या समस्यातून मार्ग काढणे तसेच प्लास्टीक उद्योगातील समस्या जाणून घेण्यासाठी तज्ञ समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या शिफारसींबाबत अंतिम निर्णय अधिकार समिती घेणार आहे. अधिकार समितीच्या या आठवड्यात होणार्‍या बैठकीत यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. अधिकार समितीने प्लास्टीक बंदी काही अंशी शिथील करण्याचा निर्णय दिल्यास आगामी तीन महिन्यात सरकारकडून याबाबत अंमलबजावणी केली जाणार आहे.औद्योगिक पॅकेजींगसाठी प्लास्टीक वापरास सरकारने परवानगी दिली आहे. असे असताना अशा प्रकारचा निर्णय घेवून प्लास्टीक उत्पादनातील लहान उद्योगांना बसणार्‍या अर्थिक फटक्याचाही विचार करायला हवा, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.