Mon, Apr 22, 2019 21:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकबंदी; दंडाच्या रकमेत होणार कपात !

प्लास्टिकबंदी; दंडाच्या रकमेत होणार कपात !

Published On: Jun 20 2018 2:01AM | Last Updated: Jun 20 2018 1:54AMमुंबई : प्रतिनिधी 

प्लास्टिकविरोधी कारवाई करताना दंडाच्या रकमेत कपात होणार नाही, असे स्पष्ट आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. पण हे आदेश झिडकारत मुंबई महापालिकेने दंडाच्या रकमेत तडजोड करून कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव विधी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री रामदास कदम विरुध्द पालिका असा सामना रंगणार आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात शनिवार 23 जूनपासून प्लास्टिकबंदी होणार आहे. त्यामुळे पालिकेने प्लास्टिकबंदी कारवाई प्रभावीपणे  राबवण्यासाठी 250 अधिकारी व कर्मचार्‍यांची टीम तयार केली आहे. पण महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम 2006 च्या कलम 9 नुसार प्रथम गुन्ह्यासाठी 5 हजार रुपये व दुसर्‍या गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये दंड आहे. एवढा मोठा दंड छोट्या ग्राहकांकडून वसूल करणे शक्य नाही. त्यामुळे तडजोडीतून दंडाच्या रक्कमेत कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार व्यवसायाचे चार टप्पे तयार करण्यात आले आहेत. यात फेरीवाला, किराणा माल, फळरस व चहाकॉफी विक्रेते व हॉटेल, मॉल आदींचा समावेश आहे. नव्या दंडात पहिल्या गुन्ह्यासाठी 200 ते 1 हजार रुपये व दुसर्‍या गुन्ह्यासाठी 500 रुपये ते 2 हजार रुपये दंड आकारण्याचे निश्‍चित केले आहे. हा दंड आकारण्याचा पालिका प्रशासनाला अधिकार मिळावा, यासाठी प्रशासनाने विधी सिमतीच्या मंजूरीसाठी प्रस्ताव सादर केले आहे. 

या प्रस्तावाला विधी समितीने मंजुरी दिल्यानंतर तो स्थायी समिती व महापालिका सभागृहाच्या अंतिम मंजुरीसाठी लागू करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. पालिका प्रशासनाने पर्यावरण मंत्र्यांच्या विरोधात घेतलेला निर्णय पालिकेतील सत्ताधारी शिवसेना फेटाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण शिवसेनेला प्रशासनाचा हा निर्णय फेटाळायचा असेल तर, भाजपा अथवा काँग्रेसच्या पाठिंब्याची आवश्यकता भासणार आहे.