Wed, Mar 20, 2019 23:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जगणे सुसह्य करण्यात पुणे पहिले; नवी मुंबई दुसरी तर मुंबई तिसरी

जगणे सुसह्य करण्यात पुणे पहिले; नवी मुंबई दुसरी तर मुंबई तिसरी

Published On: Aug 14 2018 2:03AM | Last Updated: Aug 14 2018 1:53AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

शहरांचे नियोजनबध्द व्यवस्थापन आणि शाश्‍वत विकासाच्या माध्यमातून लोकांचे जीवनस्तर उंचाविण्यात पुणे शहर देशात सर्वोत्कृष्ट ठरले आहे. त्याखालोखाल नवी मुंबई आणि तिसर्‍या क्रमांकावर मुंबईचा क्रमांक लागला. जगणे सुसह्य करण्यात ठाणे सहाव्या क्रमांकावर आले आहे. अर्थात 40 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असूनही उत्तम जीवनमान असलेल्या शहरांमध्ये मुंबई पहिली ठरली आहे. 

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी सोमवारी सुलभ जीवन निर्देशांकामध्ये असणार्‍या  प्रथम दहा शहरांची घोषणा केली. यात प्रथम पुणे तर व्दितीय क्रमांक नवी मुंबई, तृतीय क्रमांक मुंबई तर सहाव्या क्रमांकावर ठाणे या चार शहरांचा समावेश आहे. 

जून 2017 मध्ये सुलभ जीवन निर्देशांक ठरविण्यात आले होते. 19 जानेवारी 2018 पर्यंत 111 शहरांचे मुल्यांकन करण्यात आले. यामध्ये संस्थात्मक, सामाजिक, आर्थिक, भौतिक हे  चार मुख्य निकष लावण्यात आले असून यामध्ये 15 श्रेणींची वर्गवारी आणि 78  संकेतक दिलेले आहेत. या आधारे सुलभ जीवन शहर निर्देशांक ठरविण्यात आले. 

संस्थात्मक आधारावर सुलभ जीवन निर्देशाकांमध्ये निवड झालेल्या शहरांमध्ये नवी मुंबई व पुणे ही दोन शहरे महाराष्ट्र आहेत. यासह तिरूपती, करीम नगर, हैद्राबाद, बिलासपूर, कोची, अहमदाबाद, विजयवाडा, विशाखापट्टनम आहेत.

सामाजिक आधारावर निवड झालेल्या निर्देशाकांमध्ये राज्यातील नवी मुंबई, पुणे, मुंबई, वसई-विरार या 4 शहरांचा समावेश आहे. यासह तिरूपती, तिरूचिरापल्ली, चंदीगड, अमरावती, विजयवाडा, इंदोर, या शहरांचा समावेश आहे. 

आर्थिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये राज्यातील पुणे आणि ठाणे या शहरांचा सामवेश आहे. यामध्ये चंदीगड, अजमेर, कोटा, इंदोर, त्रिरूप्पुर, इटानगर, लुधियाना, विजयवाडा, या अन्य शहरांची निवड करण्यात आलेली आहे. 

भौतिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई या चार शहरांचा समावेश आहे. यासह चंदिगड, रायपूर, तिरूपती, भोपाल, बिलासपूर, विशाखापट्टनम या शहरांचा समावेश आहे. 

याशिवाय 40 लाख लोकसंख्येपेक्षा अधिक असलेल्या शहरांमध्ये उत्कृष्ट  व्यवस्थापनामध्ये मुंबई, चेन्नई, सूरत या शहरांचा समावेश आहे. 40 लाख लोकसंख्येपर्यतच्या शहरांमध्ये पुणे, नवी मुंबई, ठाणे या शहरांचा सामावेश आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेला देशभरात घेण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात  राज्यांच्या राजधान्यांच्या गटात मुंबईला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले होते. आता जीवनस्तर निर्देशांकातदेखील मुंबई महापालिकेने मोठ्या लोकसंख्येच्या शहरांमध्ये आपला अग्रक्रम अबाधित राखला आहे. मुंबईकरांना विविध सेवा सर्वोत्तम पद्धतीने देण्यासाठी महापालिका दीर्घकालीन व अल्पकालीन नियोजनाद्वारे सातत्याने प्रयत्नशील आहे. हा सन्मान मुंबईकरांचा आणि मुंबई महापालिकेचा आहे, अशी भावना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी व्यक्त केली.