Fri, Jul 19, 2019 22:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जेव्हा विमान बाल्कनीला चाटून जाते...

जेव्हा विमान बाल्कनीला चाटून जाते...

Published On: Jun 29 2018 1:30AM | Last Updated: Jun 29 2018 1:23AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

विमान कोसळले त्या ठिकाणाहून अर्ध्या किलोमीटरवर राहणार्‍या अनंत कंधोर या व्यावसायिकाने  ही दुर्घटना प्रत्यक्ष पाहिली. हे विमान नेहमीपेक्षा कमी उंचीवरून उडत होते. त्याचवेळी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ते माझ्या घराच्या बाल्कनीला अक्षरशः चाटून गेले. पुढे ते बांधकाम सुरू असलेल्या जागेवर कोसळले आणि प्रचंड मोठा आवाज होऊन या विमानाने पेट घेतला, असे कंधोर म्हणाले. 

दुर्घटनास्थळापासून जवळच राहणार्‍या हरीभाई पटेल यांनीही ही दुर्घटना याची डोळा पाहिली. ते म्हणाले, माझ्या नजरेसमोर हे विमान कोसळले. आजूबाजूला काही झाडेही होती. विमान ज्या पद्धतीने खाली येत होते ते पाहता वैमानिक मोकळी जागा विमान उतरवण्यासाठी पाहात होता असे जाणवले. 

बांधकामस्थळाच्या बाजूलाच व्यवस्थापन विषयाचे क्‍लासेस चालतात. दुर्घटनेवेळीही हे क्‍लासेस सुरू होते. सुमारे अडीचशे विद्यार्थी त्याठिकाणी उपस्थित होते. विमान ज्याठिकाणी कोसळले ते ठिकाण 5 वर्षांपासून अर्धवट असलेल्या बांधकामाने व्यापलेले आहे. इमारतीच्या उंचीला परवानगी मिळत नसल्याने ही जागा तशीच पडून होती. मात्र नुकतीच या बांधकामाला परवानगी मिळाली होती, असे शेजारीच राहणार्‍या नयना गाला यांनी सांगितले. 

बापूसाहेब उमप हे दुर्घटनास्थळाच्या जवळच राहतात. त्यांनी सांगितले की, विमान कोसळले त्यावेळी एक व्यक्‍ती त्याखाली आली. विमान कोसळताच त्यातून इंधन बाहेर पडले आणि आग भडकली. त्यामुळे आम्हाला त्या व्यक्‍तीला वाचवता आले नाही.