Mon, Mar 25, 2019 13:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गरज पडल्यास विमानमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा 

गरज पडल्यास विमानमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा 

Published On: Jul 19 2018 2:05AM | Last Updated: Jul 19 2018 2:05AMमुंबई :   विशेष प्रतिनिधी

विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेची नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) कडून चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल लवकर मिळावा म्हणून राज्य सरकारकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. गरज भासल्यास विमान मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हादेखील दाखल करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली. 

घाटकोपर येथील जागृती पार्क परिसरात 28 जून रोजी चार्टर्ड विमान कोसळून अपघातात झाला होता. या अपघातात पायलटसह पाचजणांचा मृत्यू झाला. याशिवाय नाशिक, रायगड, धुळे आणि गोंदीया येथेही विमान कोसळून अपघात झाले होते. या विमान अपघातांबाबत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, या दुर्घटनेची डीजीसीएकडून चौकशी सुरू असून अहवाल आल्यानंतर आवश्यकता भासल्यास विमानाचे मालक दीपक कोठारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. 

शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचे काम हे अत्यंत सुमार असल्याचा आरोप केला. हा आरोप फेटाळत मुंबई एटीसी हा जगातील अत्याधुनिक नियंत्रण कक्ष असून जगातील आघाडीच्या आणि सर्वोत्तम कक्षांमध्ये त्याची गणना होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई विमानतळाच्या आसपासच्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा निर्णय झाला आहे. येथील झोपडीधारकांना त्याच ठिकाणी घरे दिली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.