Thu, Jul 18, 2019 02:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › क्रिकेटमधील पैसा पाहून बोराटेला सुचली खेळाडूंना फसवण्याची योजना

क्रिकेटमधील पैसा पाहून बोराटेला सुचली खेळाडूंना फसवण्याची योजना

Published On: Dec 03 2017 1:43AM | Last Updated: Dec 03 2017 1:18AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल), रणजी ट्रॉफी तसेच परदेशातील क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवत गंडा घालणार्‍या टोळीचा म्होरक्या आणि आरएन स्पोर्ट्स क्‍लबचा मालक विजय बोराटे याने क्रिकेटमधील पैसा बघून 25 लाख गोळा करत शिरकाव केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. बोराटे याने साथीदारांच्या मदतीने रुनी मोटर्स आणि रुनी स्पोर्ट्स कंपन्या स्थापन केल्याचेही उघड झाले आहे. 

मूळचा भुसावळचा रहिवासी असलेला बोराटे याचे वाणिज्य शाखेमध्ये पदवी शिक्षण झाले आहे. पैसा कमावण्याचे स्वप्न बघून तो मुंबईत आला. शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणुकीची आमिष दाखवत त्याने अनेकांना 1 कोटी 27 लाखांना गंडा घातला. याप्रकरणी कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बोराटेला बेड्या ठोकल्या. 

डोंबिवलीतील जीवन मुकादम आणि ठाण्यातील दिनेश मोरे या दोन साथीदारांच्या मदतीने त्याने 25 लाख रुपये गोळा करत, आयपीएल सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाला खेळाडू पुरविण्याचे कंत्राट मिळवले. बोराटेचे क्‍लब कारनामे समोर येताच हैदराबाद संघाने वर्षभरातच त्याच्यांशी असलेले कंत्राट तोडले. त्यानंतर बोराटेने राजस्थान रॉयल आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठीही काम केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. क्रिकेट जगतातील नामांकित खेळाडू, प्रतिष्ठित व्यक्तीसोबत झालेल्या ओळखी, काढलेले फोटो याच्या आधारेच उदयोन्मुख खेळाडूंना आकर्षित करत त्यांच्याजवळून 10 ते 15 लाख रुपये उकळण्यास सुरुवात केल्याचेही समोर आले आहे.

उदयोन्मुख खेळाडूंना गाठण्यासाठी बोराटे आणि त्याचे साथीदार प्रशिक्षकांना शोधायचे.त्यांच्या खेळाडूंना चमकवण्याचे आमिष दाखवत होते. बोराटेच्या ओळखी असल्याच्या दिखाव्याला भुलून प्रशिक्षक त्यांचा संपर्क खेळाडूंशी करून देत असल्याने बोराटेचा हा गोरखधंदा जोरात चालला. कोणी पैसे मागायला आल्यास बोराटे त्यांना बीबीसीआयची धमकी देत असे.