Thu, Nov 15, 2018 22:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डाव्यांचा प्रभाव असलेले ११५ जिल्हे सुधारण्यासाठी योजना

डाव्यांचा प्रभाव असलेले ११५ जिल्हे सुधारण्यासाठी योजना

Published On: Apr 09 2018 1:50AM | Last Updated: Apr 09 2018 1:42AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

केंद्र सरकार व नीती आयोगाने देशात 115 जिल्ह्यांच्या आकांक्षित विकासासाठी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये उस्मानाबादचा समावेश आहे. या जिल्ह्यांच्या प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी जे सहा निकष निश्‍चित करण्यात आले आहेत त्यामध्ये डाव्या विचारसरणीग्रस्त  परिसराच्या सुधारणेकरिता धोरण हाही एक निकष ठेवण्यात आला आहे. 

मागास जिल्ह्यांचा एकात्मिक, केंद्रीभूत व लक्ष्याधारित पध्दतीने विकास करण्याचे धोरण केंद्र सरकारने हाती घेतले आहे. त्यानुसार हे 115 जिल्हे निवडले असून महाराष्ट्रातील उस्मानाबाद, नंदुरबार, वाशिम व गडचिरोली  या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत केंद्र सरकारकडून प्रभारी अधिकारी नेमले  जाणार आहेत.  अतिरिक्त सचिव वा सहसचिव दर्जाचे  हे अधिकारी असून राज्य सरकारलाही त्यासाठी प्रभारी अधिकारी व समन्वय अधिकार्‍यांची नियुक्ती करावी लागणार आहे. राज्य सरकारचे प्रभारी अधिकारी हे पालक सचिव असणार आहेत. 

 विकासाच्या  मोजमापाचे निकष 

केंद्र सरकार व नीती आयोगाने या जिल्ह्यांची प्रगती निश्‍चित करण्यासाठी सहा निकष निश्‍चित केले आहेत. आरोग्य व पोषण, शिक्षण, शेती व जलसंपदा, आर्थिक समावेश व कौशल्य निर्माण, मूलभूत सुविधा व डाव्या विचारसरणीग्रस्त परिसराच्या सुधारणेकरिता धोरण या सहा निकषांवर केलेली कामगिरी प्रगतीसाठी विचारात घेतली जाणार आहे.त्याचे मोजमाप निश्‍चित करण्यासाठी नीती आयोगाने 48 निर्देशांक ठरवून दिले आहेत. त्यानुसार केलेल्या कामगिरीच्या आधारे  ही प्रगती मोजली जाणार आहे. जे निर्देशांक निश्‍चित करण्यात आले आहेत त्यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या योजना व  जिल्हा वार्षिक योजनांचा एकत्रित आराखडा  तयार करून  त्याद्वारे जास्तीतजास्त निधी मिळविण्यासाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना तयार करावे लागणार आहेत.

अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली  कार्यकारी समिती स्थापन करण्यात येणार असुन ती समन्वयाचे काम करणार आहे. तर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. 

Tags : mumbai, mumbai news, Plan for improving 115 districts,  Central Government Decision,