Wed, May 22, 2019 07:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भावाच्या जागी 15 वर्षे नोकरी!

भावाच्या जागी 15 वर्षे नोकरी!

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 12:56AMउल्हासनगर : वार्ताहर

उल्हासनगर महापालिकेत भावाच्या जागी गेल्या 15 वर्षांपासून काम करणार्‍या राजेंद्र आढांगळे या कर्मचार्‍याच्या बोगस प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागली आहे. हे प्रकरण ज्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्यकाळात झाले, त्यांची देखील आता चौकशी सुरू आहे. शिवाय ज्या भावाच्या नावावर अढांगळेने नोकरी मिळवली, त्याची देखील रवानगी तुरुंगात करण्याची मागणी नगरसेवक भरत गंगोत्री यांनी केली आहे.  

रमेश भानुदास अढांगळे या कामगाराची 2 नोव्हेंबर 1996 रोजी उल्हासनगर मनपामध्ये सफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतरच्या काळात रमेशला आदिवासी एकात्मिक प्रकल्प गोरेगाव येथून चतुर्थ श्रेणी विभागाचा कॉल आला. 2003 मध्ये त्याने ही नोकरी स्वीकारली, पण उल्हासनगर मनपाच्या नोकरीचा राजीनामा दिला नाही. यावेळी रमेशचे नाव धारण करून त्याचा भाऊ राजेंद्र अढांगळेने उल्हासनगर पालिकेची नोकरी बळकावली आणि काही दिवसांनी त्याने महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नावात बदल करून राजेंद्र अढांगळे हे मूळ नाव धारण केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भरत गंगोत्री हे गेल्या 3 वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करीत होते. हे प्रकरण तत्कालीन मनपा आयुक्त मनोहर हिरे यांच्यासमोर आले असता त्यांनी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना चौकशीचे आदेश दिले होते. मुख्य लिपिक अच्युत सासे यांनी याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात राजेंद्र अढांगळे यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर अखेर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 3 वर्षांच्या पोलीस तपासानंतर त्याला अटक करून तुरुंगात टाकले आहे.