Thu, Jul 18, 2019 04:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खड्डे दुरुस्तीची जबाबदारी पालिकांचीच

खड्डे दुरुस्तीची जबाबदारी पालिकांचीच

Published On: Aug 19 2018 1:41AM | Last Updated: Aug 19 2018 1:09AMमुंबई : चंद्रशेखर माताडे

आपल्या हद्दीतील रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी तुमचीच आहे, यामुळे रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसाठी तत्काळ तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करा. त्यानुसार तक्रार निवारण केंद्र सुरू करा, त्याकडे आलेल्या तक्रारींचे निराकरण करा आणि तक्रारदाराला त्याची माहिती द्या, असे परिपत्रक शनिवारी नगरविकास विभागाने राज्यातील महापालिका, नगरपालिकांना दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी किती प्रभावीपणे केली जाते, त्यावर रस्त्यावरील खड्डे नाहीसे होणार की, रस्ते खड्डेमयच राहणार, हे स्पष्ट होणार आहे.

मुंबईतील रस्त्यांच्या निकृष्टतेबद्दल उच्च न्यायालयात 2013 साली याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये राज्य शासनाने सर्व महापालिकांना, खड्डे दुरुस्तीसाठी तत्काळ तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा आणि त्यावर दाखल होणार्‍या तक्रारीचे निराकरण करत, खड्डे दुरुस्तीचे कामे तातडीने पूर्ण करावे, असे आदेश दिले आहेत. याबाबत आज नगरविकास विभागाने परिपत्रकच काढले आहे.

प्रत्येक महापालिका, नगरपालिकेने ‘तक्रार निवारण केंद्र’ स्थापन करावे, त्यावर तक्रार नोंदवून घेण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबरची सेवा उपलब्ध करून द्यावी, तसेच संकेतस्थळावरून (वेबसाईट) तसेच मोबाईलद्वारे अथवा त्यावरील मेसेजद्वारेही तक्रार स्वीकारण्यात येईल, अशी व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तक्रारीसोबत छायाचित्र सादर करायचे असेल, तर ते स्वीकारण्याच्याही व्यवस्थेचा या यंत्रणेत समावेश करावा, असेही या आदेशात म्हटले आहे. द‍ृष्टीहीन (अंध) अथवा द‍ृष्टीदोष असणार्‍यांना संकेतस्थळ वापरता येईल, याद‍ृष्टीने त्यावरही सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. तक्रार निवारण यंत्रणेकरिता स्वतंत्र अधिकार्‍यांची नियुक्‍ती करून दर तीन महिन्यांनी अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.दाखल केलेल्या तक्रारीची माहिती संबंधिताला उपलब्ध व्हावी, याकरिता ट्रॅकिंगची सुविधा तयार करावी. तसेच तक्रार आल्यानंतर तीन आठवड्यांत त्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, असेही नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

मोबाईलवरून तक्रार

ही यंत्रणा कार्यान्वित करताना मोबाईलद्वारे नागरिकांना तक्रार देता येणार आहे. याद‍ृष्टीने महापालिका, नगरपालिकांनी यंत्रणा विकसित करावी, असे या आदेशात स्पष्ट केले आहे. यामुळे नागरिकांना घरबसल्या छायाचित्रांसह (पुराव्यासह) तक्रार दाखल करता येणार आहे. मात्र, उपलब्ध निधी, मनुष्यबळ, रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या, पावसाचे प्रमाण आणि दाखल होणार्‍या तक्रारींचे प्रमाण, यामुळे या आदेशाची अमंलबजावणी करताना महापालिका, नगरपालिकांना कसरत करावी लागणार आहे.

खड्डे शास्त्रोक्‍त पद्धतीने मुजवा

रस्त्यावर पडलेले खड्डे किंवा भेगा या शास्त्रोक्‍त पद्धतीने मुजवाव्यात, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे. बहुतांशवेळा तत्कालिक उपाय म्हणून माती, मुरूम आदींद्वारे खड्डे मुजवले जातात.यामुळे खड्डे भरण्याऐवजी अधिकच खराब होऊन अपघाताला निमंत्रण देत असतात. यामुळे ते शास्त्रोक्‍त पद्धतीचा वापर करूनच भरावे, असेही या आदेशात म्हटले आहे.