Mon, Apr 22, 2019 15:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भौतिकशास्त्राने अनेकांना रडवले!

भौतिकशास्त्राने अनेकांना रडवले!

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 07 2018 1:39AMमुंबई : प्रतिनिधी

देशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या नीट परीक्षेत रविवारी भौतिकशास्त्राच्या पेपरने अनेक विद्यार्थ्यांना रडवले. सीबीएसई बोर्डाने दिलेल्या ड्रेसकोडबाबत नियमावली न पाळल्याने अनेकांना अटकाव केल्याने मुंबईबाहेर अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचे चित्र होते.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एमबीबीएस आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एकूण सहा हजार जागांसाठी ही परीक्षा रविवारी झाली. देशभरातून एकूण 13 लाख 26 हजार 961 विद्यार्थ्यांनी  परीक्षेला नोंदणी केली होती.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भौतिकशास्त्राचा पेपर कठीण गेल्याने तर अनेकांना रडू आवरेना. 720 गुणांच्या परीक्षेत एकूण 180 प्रश्न विचारण्यात आले होते. प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तरासाठी चार गुण आहेत. तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी विद्यार्थ्यांचा एक गुण वजा होईल.  भौतिकशास्त्राच्या परीक्षेसाठी किचकट आणि वेळखाऊ प्रश्‍नामुळे विद्यार्थ्यांना वेळ कमी पडल्याची तक्रार करण्यात आली. भौतिकशास्त्राचा पेपर सर्वात कठीण होता अशी माहिती परीक्षा देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या शर्ट कॉलर कापल्या

ड्रेसकोडची नियमावली न पाळलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर नियमांना तोंड द्यावे लागले. पुण्यातील काही केंद्रावर कॉलर असलेले शर्ट घालून येण्यास मनाई केलेली असतानाही अनेक विद्यार्थी कॉलर असलेले शर्ट घालून परीक्षेसाठी आले. असा शर्ट घालून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शर्टची कॉलर कापण्यात आली. त्यानंतरच परीक्षेला बसू देण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर माध्यमानुसार प्रश्नपत्रिका आली नसल्याची तक्रार समोर आली होती. उशिराने आलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात परवानगी देण्यात न आल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राजवळ गोंधळ केल्याच्या घटना समोर आल्या. मात्र त्यानंतरही परवानगी न देण्यात विद्यार्थ्यांना माघारी फिरावे लागले अशा घटना राज्यभरात काही केंद्रांवर झाल्या.

Tags : Mumbai, mumbai news, Physics, paper difficult,