Thu, Jul 09, 2020 07:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल दरवाढ

सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल दरवाढ

Last Updated: Nov 17 2019 1:32AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

शनिवारी सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ झाली. मुंबई, दिल्‍ली आणि कोलकाता या तीन महानगरांमध्ये पेट्रोल लिटरमागे 14 पैशांनी वाढले. चेन्नईत मात्र हीच वाढ 15 पैशांची आहे. वरकरणी ही वाढ 14 पैशांची दिसत असली तरी सर्व कर समाविष्ट केल्यानंतर  चित्र धक्‍का देते. म्हणजे मुंबईसह वरील तीन महानगरांत पेट्रोल प्रत्यक्षात 47 पैशांनी आणि चेन्नईत 50 पैशांनी महागले आहे. डिझेलच्या दरात मात्र कोणताही बदल नाही. 

दरवाढीसोबतच वाहनधारकांसाठी आणखी एक वाईट बातमी शनिवारी येऊन धडकली. ती म्हणजे आतापर्यंत पेट्रोल पंपावर के्रडिट कार्ड वापरल्यास जी सूट दिली जात होती ती आता बंद करण्यात आली आहे. 0.75 टक्के सूट सरकारी कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर गेल्या अडीच वर्षापासून क्रेडिट कार्डवर दिली जात होती. ती 1 ऑक्टोबरपासूनच थांबवण्यात आली आहे. 2016 च्या उत्तरार्धात म्हणजे नोटाबंदीच्या तडाख्यात रोख रकमेची चणचण बाजारपेठेत निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारनेच अशी सूट देण्याचे आदेश इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना दिले होते.  त्यावेळी बाजारपेठेत 86 % नोटा चलनात होत्या. आता परिस्थिती बदलल्यामुळे ही सूट मागे घेतल्याचे सांगितले जाते.