Thu, Feb 21, 2019 11:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुजरातमध्ये पेट्रोल ८ रुपयांनी स्वस्त

गुजरातमध्ये पेट्रोल ८ रुपयांनी स्वस्त

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 10 2018 1:17AMतलासरी : सुरेश वळवी

इंधनाचे वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक बजेट पूर्णतः कोलमडले असून राज्यभरात महागाई गगनाला भिडली आहे. मात्र, शेजारच्या गुजरात राज्यात महाराष्ट्रापेक्षा पेट्रोलचे दर 8 रुपयांनी कमी असल्याने पालघर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील वाहनचालक गुजरातमध्ये जाऊन पेट्रोल भरत आहेत.

पालघर जिल्ह्यात तलासरी तालुक्यातील पेट्रोल पंपांवर शुक्रवारी डिझेलचे दर 75.84 तर पेट्रोलचे दर 87.94 पैसे इतके  होते. मात्र, महाराष्ट्र आणि गुजरात तसेच केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेलीत पेट्रोल-डिझेलच्या दरांमधील तफावत पाहिल्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलच्या दरांत इतकी तफावत का? महाराष्ट्राच्या सीमेवरील आच्छाडपासून अवघ्या 3 कि.मी. अंतरावरच्या गुजरातमधील तलवाडा येथे पेट्रोल साडेसात रुपयांनी स्वस्त आहे.

शुक्रवारी येथील पंपांवर पेट्रोलचे दर 80.13 पैसे, तर डिझेल मात्र महाराष्ट्रापेक्षा अडीच रुपयांनी महाग म्हणजेच 78.34 पैसे होते. हेच दर केंद्रशासित प्रदेशातील सिल्वासा, नारोलीमधील पेट्रोल पंपांवर डिझेल 73.14 आणि पेट्रोल 80.38 रुपये होते. तलासरी तालुक्यामध्ये मिनिडोर, तीनचाकी रिक्षा, मॅजिक, इको तसेच अन्य चारचाकी वाहने हजारांच्या घरात आहेत. ही वाहने उधवा-तलासरी, उंबरगाव-संजान-तलासरी, सिल्वासा, भिलाड, वापी, तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी, मनोर, विरार इत्यादी ठिकाणापर्यंत धावतात. ही सर्व वाहने इंधन भरणा करण्यासाठी जवळच्या या स्वस्त राज्यात जात आहेत.