Thu, May 23, 2019 15:32
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पेट्रोल-डिझेलची पाच वर्षांतील उच्चांकी

पेट्रोल-डिझेलची पाच वर्षांतील उच्चांकी

Published On: Apr 25 2018 2:24AM | Last Updated: Apr 25 2018 2:12AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सलग सहाव्या दिवशीही वाढ झाली असून, दोन्हीचे दर पाच वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. त्यातही मुंबईकरांवर नेहमीप्रमाणे सर्वोच्च भार पडला आहे. राजधानी दिल्‍लीत पेट्रोल 74.63 रुपये लिटर, तर मुंबईत 77.43 रुपये लिटर इतके होतेे. दिल्‍लीत डिझेल 65.93, तर मुंबईत 70.20 रुपये लिटर होते. पेट्रोलचे दर सप्टेंबर 2013 नंतर उच्चांकी पातळीवर आहेत. 

एप्रिल महिन्यात आतापर्यंत पेट्रोल 1 रुपया 14 पैसे, तर डिझेल 1 रुपया 63 पैशांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती 75 डॉलर प्रतिबॅरल इतक्या झाल्या असून, 2014 नंतरचा हा उच्चांकी दर आहे.

राज्यात 2015 मध्ये दुष्काळसद‍ृश परिस्थिती निर्माण झाली होती. यासाठी निधी उपलब्ध करून देण्याकरिता पेट्रोल-डिझेलवर प्रतिलिटर दोन रुपये अधिभार लावण्यात आला होता. मात्र, हा अधिभार अद्याप रद्द करण्यात आलेला नाही. गेल्यावर्षी महामार्गांवरील मद्याची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सरकारने पेट्रोल व डिझेलवर आणखी दोन रुपये अधिभार लावून बुडणार्‍या महसुलाची भरपाई करण्यास सुरुवात केली. आता मद्य दुकाने सुरू झाली, तरी अधिभाराची वसुली थांबवलेली नाही. साडेचार वर्षांतील या सर्वोच्च दरावरून केंद्रातील भाजप सरकारवर विरोधकांनी शरसंधान केले असून इंधन दरांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या तसेच महाराष्ट्रासह काही राज्यांतील अतिरिक्त कर रद्द करून ग्राहकांना दिलासा देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलण्याची शक्यता आता मावळली आहे. 

वाढत्या किंमतीपासून सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यास केंद्रीय अर्थ खाते तयार नसल्याचे समजते. त्याऐवजी राज्यांनी इंधनावरील विक्रीकर आणि मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करावा, असे अर्थ खात्याचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीपैकी एक चतुर्थाश भाग अबकारी कराचा असतो.